सांगली- ज्या उंदराचा वाघ आम्ही बनवला, त्याच वाघाकडून आमच्यावर हल्ला होत आहे. त्यामुळे आता या वाघाला उंदीर बनवण्याची वेळ आली आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार विशाल पाटील यांनी भाजप उमेदवार संजयकाका पाटील यांच्यावर केली आहे. तसेच वसंतदादा यांच्याप्रमाणे जनतेत मिसळलो नाही, ही आमची चूक झाली, अशी कबुली पाटील यांनी यावेळी दिली. मिरजेत आयोजित प्रचार सभेत ते बोलत होते.
संजयकाका पाटील म्हणजे आम्ही उंदराचा बनवलेला वाघ; विशाल पाटलांची घणाघाती टीका - congress
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी आज त्याच्या प्रचारार्थ मिरजेत आयोजित सभेत भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्यावर सडकून टीका केली.
![संजयकाका पाटील म्हणजे आम्ही उंदराचा बनवलेला वाघ; विशाल पाटलांची घणाघाती टीका](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/images/768-512-3054631-thumbnail-3x2-sangli.jpg)
सांगली लोकसभा निवडणुकीचा अंतिम टप्प्यातील प्रचार शिगेला पोहचला आहे. तिन्ही पक्षांच्या उमेदवारांकडून एकमेकांवर तुफानी टीका करण्यात येत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार आणि माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांनी आज त्याच्या प्रचारार्थ मिरजेत आयोजित सभेत भाजपचे उमेदवार विद्यमान खासदार संजयकाका पाटील यांच्यावर सडकून टीका केली. दुर्दैवाने मागील निवडणुकीत आपण यांना खासदार केले. पण, यांना आम्हीच मोठे केले ही आमची चूक झाली, असे मत विशाल पाटील यांनी व्यक्त करत खासदार संजयकाका यांना उंदराची उपमा दिली.
त्याच बरोबर वसंतदादा पाटील यांना मानणारे अनेक लोक आता भेटत आहेत. ते सांगतात की, वसंतदादा आम्हाला नावाने ओळखत होते, आमच्या घरी जेऊन गेले, यावरून दादांचा जनतेशी किती जिव्हाळा होते हे स्पष्ट होते. मात्र, आम्ही दादांचे नातू म्हणून दादांप्रमाणे जनतेत मिसळू शकलो नाही. हे आमची सर्वात मोठी चूक होती. पण आता तसे होणार नाही याची ग्वाही आपण देत असल्याचे यावेळी विशाल पाटील यांनी सांगितले.