सांगली - राज्य सरकारला केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीवरून राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे. राज्य सरकारला मदत करण्यासाठी केंद्र सरकार हात आखडता घेत असल्याचा आरोप मंत्री वडेट्टीवार यांनी केला आहे. तसेच कोरोनाचा २८ दिवसांचा कंटेंमेट झोनचा कालावधी कमी करण्याचा निर्णय येत्या २ दिवसात घेण्यात येणार असल्याची माहितीही मंत्री वडेट्टीवार यांनी दिली. सांगलीमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी गुरूवारी सांगली जिल्ह्यातील कोरोना आणि संभाव्य पूर परिस्थितीची व गतवर्षीच्या पूरातील मदतीचा आढावा घेतला. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या आढावा बैठकीला कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी, जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा, महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, आमदार विक्रम सावंत यांच्यासह पदाधिकारी व अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मंत्री वडट्टीवर यांनी जिल्ह्यातील कोरोनाची स्थिती त्याचबरोबर गतवर्षी आलेल्या महापुरात वाटप झालेले अनुदान, त्याचबरोबर संभाव्य पूर परिस्थितीबाबत प्रशासनाकडून करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेतला. यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मंत्री वडेट्टीवर यांनी सांगली जिल्ह्यात संभाव्य महापुराच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून पुराचे नियोजन झाले आहे. पूर आल्यास जिल्ह्यातील ३१ हजार कुटुंब व त्यांच्या जनावरांना हलवण्याची तयारी करण्यात आली आहे. त्यासाठी १२१ निवारा ठिकाण निश्चित करण्यात आले आहेत. तसेच पुराच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून बोटी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. याशिवाय राज्य सरकारच्या आपत्ती विभागाकडून सांगली, कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्यासाठी अधिकच्या बोटी लवकरच देण्यात येणार असून जुलै महिन्याच्या आणि ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंत या बोटी मिळतील, असे स्पष्ट केले.