सांगली - पावसामुळे सांगली जिल्ह्यातील भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. परिणामी, भाज्यांचे दर गगनाला भिडले आहेत. जिल्ह्यातील जवळपास 50 टक्के भाजीपाल्याचे क्षेत्र पावसामुळे बाधित झाले आहे. त्यामुळे भाजीपाल्याच उत्पादन घटले आहे आणि शेतकऱ्यांना नुकसानीचा, तर सर्वसामान्यांना वाढलेल्या दराचा फटका बसत आहे.
पावसाने भाज्यांचे दर भिडले गगनाला, दुप्पट दराने सुरूय विक्री ऑगस्ट महिन्यामध्ये सांगली जिल्ह्यात संततधार पाऊस पडला. १५ दिवस पडलेल्या या पावसामुळे जिल्ह्यातील वारणा आणि कृष्णा या दोन्ही नद्यांना पूर आला होता. नदी काठच्या शेतांमध्ये पाणी घुसले होते, तर इतर ठिकाणी पावसाचे पाणी साचले होते. याचा सर्वात मोठा फटका बसला तो भाजीपाला पिकाला. जिल्ह्यात जवळपास चार हजार हेक्टरहून अधिक भाजीपाल्याचे क्षेत्र आहे. यामध्ये प्रामुख्याने टोमॅटो, वांगी, ढबू मिरची, गवार, मिरची, भेंडी, फ्लॉवर, कोबी, पालक, मेथी, शेपू, दोडका, अशा अनेक भाजीपाल्याचे उत्पादन घेतले जाते. मात्र, या भाजीपाल्यास संततधार पावसाचा फटका बसून ते बाधित होऊन परिणामी 50 टक्के नुकसान झाले आहे. याचा मोठा परिणाम भाजीपाल्यांच्या दरावर सध्या झाला आहे. कमी प्रमाणात भाजीपाला क्षेत्र शिल्लक आहे आणि उत्पादन घटल्याने बाजारात भाजीपाल्याची मोठया प्रमाणात आवक घटली आहे. मागणी मात्र वाढलेली आहे. त्यामुळे भाज्यांचे दर सध्या गगनाला भिडले आहेत. सांगलीमध्ये सध्या दुप्पट दराने भाजी विक्री सुरू आहे.
सांगलीच्या बाजारात भाजीपाल्याची मागणी मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, तुलनेने आवक कमी आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा केवळ 20 टक्केच भाजीपाला बाजारात पोहोचत आहे, तर जवळपास 80 टक्के भाजीपाला कर्नाटक, कोल्हापूर, सोलापूर, लातूर या जिल्ह्यातून सांगली जिल्ह्यामध्ये येत आहे. मात्र, पावसाचा परिणाम त्याठिकाणीही झाल्याचं पाहायला मिळत आहे. परिणामी, वाहतूक व इतर खर्च यामुळे तो भाजीपाला सुद्धा चढ्या दराने होलसेल मार्केटमध्ये विकला जातोय.
सांगलीच्या वारणा आणि कृष्णा काठावरची वांगी ही सर्वदूर प्रसिद्ध आहेत. त्यांना मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात मागणीसुद्धा असते. मात्र, त्याचे उत्पादन जवळपास पन्नास टक्क्यांनी घटली आहे. त्यामुळे वांग्यांचे दर दुप्पट झाले आहेत. सांगलीच्या बाजारात सध्या सर्वसामान्य ग्राहकांना 120 रुपये किलो या दराने वांग्याची खरेदी करावी लागत आहे. त्याचबरोबर इतर भाजीपाल्यांचे दर हे दुप्पट झाले आहेत. विशेषतः मिरज तालुक्यात पालक भाजीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र, पावसामुळे या भाज्यांचे मोठे नुकसान झाले आहे आणि सध्या पालक भाजी इतर ठिकाणाहून सांगलीच्या बाजारपेठेत दाखल होत आहे. कोथिंबीर दहा रुपयांनी विकली जात होती. ती सध्या 40 रुपये पेंडी या दराने विकली जात आहे. दहा रुपये प्रति पेंडी विकली जाणारी शेपू, मेथी, अंबाडा अशा इतर भाज्या आता दुप्पट दराने विकल्या जात आहेत.
सांगली जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात मुंबई, पुणे याठिकाणी भाजीपाला पाठवला जातो. मात्र, त्यावरही पावसाचा परिणाम झाला आहे. केवळ 20 ते 30 टक्केच भाजीपाला सध्या मुंबई, पुणे या ठिकाणी रवाना होत आहे. मात्र, त्याचेही दर वाढलेले आहेत.
ऑगस्ट महिन्यात पहिल्या १५ दिवसांत पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावली होती. या संततधार पावसामुळे वारणा आणि कृष्णा नद्यांना पूर आला होता. याठिकाणी मोठ्या प्रमाणात नदीकाठच्या शेतांमध्ये पाणी घुसले. प्रामुख्याने याठिकाणी भाजीपाल्याचे पिक घेतले जाते. अनेक शेतकरी आंतरपीक म्हणून भाजीपाला घेतात. मात्र, या भाजीपाल्यांचे नुकसान झाले. यंदा सांगली जिल्ह्यात 4 हजार हेकटर क्षेत्रावर जवळपास भाजीपाला पिकाची पेरणी झाली होती. मात्र, पावसाने जवळपास 50 टक्के क्षेत्राचे नुकसान होऊन उत्पादन घटले आहे. परिणामी भाजीपाल्याचे दर सध्या वाढल्याचे पाहायला मिळत असल्याचे कृषी अधिक्षक बसवराज मास्तोळी यांनी सांगितले.
मोठ्या प्रमाणात सगळीकडेच यंदा पाऊस झालेला आहे. त्याचा परिणाम सगळ्यात जास्त भाजीपाल्याच्या उत्पादनावर आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. तसेच त्याचा भार आता सर्वसामन्यांनाही सोसावा लागत आहे. सांगली जिल्ह्यातील जवळपास 20 ते 30 टक्केच भाजीपाला बाजारात येत आहे. इतर भाजीपाला कर्नाटक, कोल्हापूर, सोलापूर, लातूर या दुसऱ्या जिल्ह्यातून येत आहे. मात्र, त्याठिकाणीही पावसाचा फटका बसला आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. महत्त्वाचे म्हणजे लॉकडाउनमुळे हॉटेल, रेस्टॉरंट हे पूर्ण क्षमतेने सुरू नाहीत, अन्यथा याहीपेक्षा भाजीपाल्यांचे दर अधिक वाढले असते आणि ते सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले असते, असे जनसेवा भाजीपाल विक्रेते संघाचे अध्यक्ष शंभूराज काटकर यांनी सांगितले. त्याचबरोबर पुढील तीन महिने अशाच पद्धतीने भाज्यांचे दर हे वाढलेले पाहायला मिळतील. कारण अजून परतीचा पाऊस यायचा आहे आणि शेतात अजूनही पावसाचे पाणी साचून आहे. त्यामुळे पेरणी करणे अवघड असल्याने भाजीपाल्याचे जास्तीचे उत्पादन होणार नाही. त्यामुळे आणखी तीन महिने अशीच स्थिती राहणार असल्याचा अंदाज शंभूराज काटकर यांनी व्यक्त केला आहे.
पावसाळ्याच्या आधी भाजीपाल्याचे दर कमी होते. दहा रुपये दराने भाज्यांची पेंडी विकली जात होती, तर वांगी 60 ते 70 रुपये इतक्या दराने विक्री सुरू होती. मात्र, सांगली आणि आसपास संततधार पाऊस पडल्यानंतर भाजीपाल्यांचे दर वाढले आहेत. आवक मोठ्या प्रमाणात घटली आहे. त्यामुळे जो भाजीपाला येत आहे, तो चढ्या दराने लिलावात विकत घ्यावा लागत आहे. कोथिंबीर पेंडी होलसेल बाजारात 32 रुपये दराने खरेदी करावी लागत आहे आणि वाहतूक, तूट, आमचा नफा मिळून ती आता 40 रुपयांना विकावी लागत आहे. वांगी ही जवळपास नव्वद ते शंभर रुपये प्रतिकिलो दराने खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे ती 120 च्या घरात जाऊन पोहोचले आहे आणि अशाच पद्धतीने इतर भाज्यांच्या बाबतीत चित्र आहे. ज्या भाज्या 40 रुपये किलो होत्या, त्या आता दुप्पट दराने विकावे लागत आहेत. चाकवत भाजी गेल्या महिन्यापासून पावसाने झालेल्या नुकसानीमुळे बाजारात आलेलीच नाही, असे भाजी विक्रेते अजित राजोबा यांनी सांगितले आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊननंतर सर्व सामान्यांचे जगणे कठीण झाले आहे. आधीच रोजगार नाही. नोकऱ्या गेल्या आहेत. हातावरचे पोट असणाऱ्या लोकांना रोजचे 100 रुपये मिळवणे सुद्धा अवघड बनले आहे. त्यात भाज्यांचे दर वाढलेले आहेत. आमच्या 5 व्यक्तिंच्या कुटुंबासाठी दोन भाज्या खरेदी करायची म्हटले तर 100 रुपये जातात. त्यामुळे हातावरचे पोट असणाऱ्यांना कमवायचे आणि सगळे पैसे भाजी खरेदी करण्यात घालवायची वेळ आली आहे, अशी व्यथा गृहिणी रंजनी नाईक यांनी मांडली.