सांगली- महापुराचा फटका भाजीपाल्यांनाही बसला आहे. त्यामुळे सांगलीमध्ये भाजीपाल्यांचे दर गगनाला भिडले आहेत. 40 ते 50 रुपये किलो असणारे भाजीपाल्यांचे दर आता दीडशे रुपयांच्यापुढे पोहोचले आहेत. हे दर पुढील तीन महिन्यांपर्यंत असेच राहतील, असा अंदाज भाजीपाला विक्रेत्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे सांगलीकरांना पुढील काही महिने भाजीपाल्यांपासून दोन हात दूरच राहावे लागणार आहे.
सांगलीच्या महापुराचा फटका भाजीपाल्यावर मोठ्या प्रमाणात आता दिसून येऊ लागला आहे. सांगलीचे जनजीवन पूर्वपदावर जसे-जसे येत आहे, तसे भाजीपाल्याचे दर गगनाला भिडू लागले आहेत. प्रामुख्याने वांगी, दोडका, कोबी, फ्लॉवर, ढबु मिरची, देशी काकडी यासह मेथी, पालक, कोथिंबीर अश्या रोजच्या वापरात असणारे भाजीपाल्यांचे दर कडाडले आहेत.
सांगलीच्या बाजारात होणारी कमी आवक आणि वाढत चाललेली मागणी यामुळे हे दर वाढत आहेत.