सांगली- येथील वसंतदादा कारखान्याच्या माध्यमातून 100 खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्यात येणार आहे, अशी घोषणा साखर कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते खासदार शरद पवार यांनी कारखानदारांनी कोविड रुग्णालय निर्माण करण्याचे आवाहन केले होते, त्यानुसार विशाल पाटील यांनी त्याला प्रतिसाद देत कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे.
राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अनेक ठिकाणी कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करण्यासाठी प्रशासनाची यंत्रणा अपुरी पडत आहे. त्या पार्श्वभूमीवर खासदार शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखानदारांना कोविड सेंटर उभे करावे, असे आवाहन केले होते. पवारांच्या या आवाहनानुसार सांगलीच्या वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून कोविड रुग्णालय उभारण्याचा निर्णय घेतल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील यांनी दिली आहे.
वसंतदादा साखर कारखाना उभारणार 100 खाटांचे कोविड सेंटर; विशाल पाटलांची माहिती
सांगलीतील वसंतदादा सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून 100 खाटांचे कोविड रुग्णालय उभारण्यात आहे, अशी माहिती कारखान्याने अध्यक्ष विशाल पाटील दिली आहे.
कारखाना परिसरात शंभर खाटांचे आधुनिक रुग्णालय निर्माण करण्याचा मानस विशाल पाटील यांनी व्यक्त करत प्रशासनाला तसा अहवाल सादर करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच कारखाना कार्यस्थळावर असलेल्या जागेवर तातडीने हे रुग्णालय उभे करण्याची आमची तयारी आहे. कोरोनाचे संकट अत्यंत मोठे आहे. शासनाच्या यंत्रणेला कोरोनाशी लढताना काही मर्यादा येत आहेत. यासाठी शरद पवार यांनी राज्यातील साखर कारखान्यांना आवाहन करुन तातडीने कोविड रुग्णालय उभे करण्यास सांगितले आहे. वसंतदादा पाटील कुटुंबिय नेहमीच जनतेच्या हितासाठी अग्रेसर राहिले आहेत. कारखान्याच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे यापूर्वी झालेले आहेत. कोरोना काळात पहिल्या टप्प्यातच वसंतदादा कारखान्याने सॅनिटायझरचे उत्पादन करुन ते अनेक गावांमध्ये मोफत वाटप केले होते. त्याचबरोबर प्रशासनाला यापूर्वीच आयसोलेशन वार्ड आणि कॉरंटाईनसाठी वसंतदादा कारखान्याची जागा उपलब्ध करुन देण्यात आली होती. आता सांगली जिल्ह्यात तसेच सांगली महापालिका क्षेत्रात वाढणारा कोरोना संसर्ग लक्षात घेऊन कारखाना कार्यस्थळावर तातडीने शंभर खाटांचे कोविड रुग्णालय उभे करण्याची आमची तयारी आहे. यासाठी आम्ही महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना तसा प्रस्ताव दिला आहे, अशी माहिती विशाल पाटील यांनी दिली.
तर सभासदांच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी यांच्याकडेही प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी जागेची पाहणी केलेली आहे. शासनामार्फत हे रुग्णालय चालवावे किंवा त्यांची अडचण असल्यास आम्हीही हे रुग्णालय चालविण्याची तयारी दर्शविली असल्याचे पाटील यांनी म्हणाले. ऑक्सिजन पुरवठ्यासहीत हे कोविड रुग्णालय करण्याचा आमचा प्रस्ताव असून तो तातडीने मंजूर केल्यास रुग्णांची चांगली सोय होईल, असा विश्वास विशाल पाटील यांनी व्यक्त केला आहे.