सांगली -जिल्ह्यात कोरोना लसीचा साठा संपला आहे, त्यामुळे जवळपास अनेक केंद्रावरील लसीकरण मोहीम दुपार पासून ठप्प झाला आहे. जिल्हा प्रशासनाकडून 2 लाख लसीची मागणी करण्यात आली असून मध्यरात्री किंवा गुरुवार पर्यंत लसी प्राप्त होतील, असा विश्वास प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आला आहे.
सांगली जिल्ह्यातील लसीचा साठा संपला, अनेक केंद्रावरील लसीकरण ठप्प - सांगली कोरोना अपडेट
सांगली जिल्ह्यातील कोरोना लसीचा साठा संपला आहे. अनेक केंद्रावरील लसीकरण यामुळे ठप्प झाले आहे.
साठा संपला,लसीकरण ठप्प -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम सुरू आहे, लसीकरण मोहिमे अंतर्गत देण्यात येणाऱ्या लसीचा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झालेला आहे. बुधवार अखेरपर्यंत असणार लसीचा साठा संपलेला आहे. त्यामुळे बुधवारी दुपारपर्यंत अनेक केंद्रांवरची सुरू असलेली लसीकरण मोहीम ठप्प झालेली आहे. जवळपास दोनशे सत्तावीस केंद्रांच्या माध्यमातून ही लसीकरण मोहीम सुरू आहे. मात्र, जिल्हा आरोग्य विभागाकडे बुधवार अखेर 15 हजार लसीचा साठा शिल्लक होता, तो विविध केंद्रांवर रवाना झाला होता. मात्र, अनेक ठिकाणी दुपार नंतर लसीचा तुटवडा निर्माण होऊन लसीकरण केंद्र रिकामी पडल्याचे चित्र पाहायला मिळाले. आतापर्यंत जिल्ह्यात दोन लाख पन्नास हजाराहून अधिक जणांना लस देण्यात आली आहे. मात्र, आरोग्य विभागाकडील लसीचासाठा संपला आहे. त्याचा परिणाम आता लसीकरण मोहीम वर झालेला आहे. आरोग्य प्रशासनाकडून राज्य शासनाकडे दोन लाख लसींची मागणी करण्यात आली असून बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास किंवा गुरुवारी सकाळपर्यंत लसी दाखल होतील. त्यामुळे नागरिकांना घाबरून जावू नये, असे आवाहन जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.