महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'सीबीआयचा वापर महाआघाडी सरकार अडचणीत आणण्यासाठी, पण आम्ही याला भीक घालणार नाही' - जयंत पाटील

माजी गृहमंत्री देशमुख यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्याबाबत संशय व्यक्त करत राज्यातील सरकारला अडचणीत आणण्यासाठी हा उद्योग सुरू असल्याचा आरोप करत, आम्ही याला भीक घालणार नाही, असा इशारा मंत्री पाटील यांनी दिला आहे.

jayant patil over anil deshmukh
jayant patil over anil deshmukh

By

Published : Apr 24, 2021, 6:46 PM IST

Updated : Apr 24, 2021, 6:55 PM IST

सांगली -देशात आता न्याय राहिला नसून सीबीआय सारख्या यंत्रणांचा गैरवापर होत असल्याची टीका जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी केली आहे. तसेच माजी गृहमंत्री देशमुख यांच्या घरावर टाकण्यात आलेल्या छाप्याबाबत संशय व्यक्त करत राज्यातील सरकारला अडचणीत आणण्यासाठी हा उद्योग सुरू असल्याचा आरोप करत, आम्ही याला भीक घालणार नाही, असा इशारा मंत्री पाटील यांनी दिला आहे. ते सांगलीमध्ये बोलत होते.

जयंत पाटील सीबीआयच्या कारवाईवर प्रतिक्रिया देताना

सीबीआयचा गैरवापर -

ॲन्टिलिया प्रकरणी सीबीआयकडून माजी गृहमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी जोरदार टीका केली आहे. मंत्री पाटील म्हणाले कोर्टाने फक्त देशमुख यांच्यावर झालेल्या आरोपाची प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते, पण सीबीआयकडून थेट त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला आहे. आणि हा सर्व प्रकार बदनाम करण्याचे कृत्य सीबीआय करत असल्याचा आरोप पाटील यांनी केला आहे. तसेच सीबीआयचा वापर विरोधी पक्षातील लोकांना नामोहरम करण्याची ही पहिली वेळ नाही. तर आतापर्यंत भाजपच्या एकाही नेत्यावर सीबीआयने धाडी टाकल्या नाहीत, मात्र विरोधी पक्षातील अनेक नेत्यांवर धाडी टाकल्या गेल्या आहेत. सीबीआयचा गैरवापर होतोय हे आता भारतातील जनतेला कळले आहे. तसेच धाडीमधून काय हाती लागले आणि काय निष्कर्ष काढला आहे, हे आताच सीबीआयने सांगितले पाहिजे हा आमचा आग्रह. कारण धाडीच्या वेळी काही सामान देशमुख यांच्या घरात घेऊन गेल्याची घटना घडली आहे आणि हा प्रकार गंभीर असल्याचे मंत्री पाटील यांनी व्यक्त केले आहे.

देशात आता न्याय राहिला नाही..

जयंत पाटील म्हणाले ,देशात आता न्याय राहिला नाही, न्याय देणाऱ्या सीबीआय सारख्या यंत्रणाचा गैरवापर करण्याची पद्धत सुरु झाली आहे.त्याच बरोबर भाजपला राष्ट्रवादी पक्ष डोळ्यात जास्त सलतोय, राष्ट्रवादीची ताकद वाढू नये याचा पुरेपूर प्रयत्न भाजपकडून केला जात आहे. राष्ट्रवादीला नामोहरम करण्याचा एककलमी कार्यक्रम भाजपचा आहे. तसेच राज्यातील आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचा हा सर्व प्रयत्न असून आम्ही कोणीही याला भीक घालणार नाही, असा इशाराही यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी दिला.

Last Updated : Apr 24, 2021, 6:55 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details