सांगली- जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला. तर शिराळा आणि कडेगाव तालुक्यातील काही भागात गारांचा पाऊस झाला आहे. अवकाळी पावसाने सांगली लोकसभेच्या निवडणूकीतील सर्व पक्षांच्या उमेदवारांच्या आजच्या प्रचारावर पाणी फिरविले आहे.
जिल्ह्यात शनिवारी सांयकाळनंतर अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील शिराळा,कडेगाव,वाळवा,तासगाव, मिरज तालुक्यासह सांगली शहर परिसरात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला. अचानक वातावरणात बदल होऊन सोसाट्याचा वारा सुटला. दुपार पर्यंत उकाड्याने सांगलीकर हैराण झाले होते. अचानक झालेल्या ढगाळ हवामान आणि वादळी वाऱ्यामुळे त्यांची धांदल उडाली होती.