सांगली -लग्नाच्या सर्व रूढी परंपरांना फाटा देत सांगलीत एक अनोखा विवाह सोहळा पार पडला. फुलांच्या अक्षता, पुस्तकांचा आहेर, पुस्तकांसोबत रुखवत आणि लग्न मंडपात वीर सैनिकांच्या पत्नींचा सत्कार, असा आगळा-वेगळा सत्यशोधक पद्धतीने विवाह सोहळा तासगाव तालुक्यातील करोली याठिकाणी झाला.
'लग्न' ही प्रत्येकाच्याच जीवनातील अत्यंत महत्त्वाची गोष्ट. पण त्याचबरोबर अनेक चुकीच्या प्रथा, कालबाह्य रुढी आणि त्यातून होणारे शोषण यांचा प्रत्यय अनेक ठिकाणी येतो. कर्ज काढून केलेला वायफळ खर्च, दिखाऊपणा यामुळे अनेक विवाह समारंभांच्या आनंदाला गालबोट लागले आहे.
या सर्व अनिष्ट प्रकारांना महात्मा जोतिबा फुले यांनी सत्यशोधक चळवळीचा सर्वोत्तम आणि समर्थ पर्याय दिला. त्यालाच अनुसरून तासगाव तालुक्यातल्या करोली याठिकाणी पुरोगामी विचारांचे ए.डी.पाटील यांच्या कुटुंबात अनोख्या पद्धतीने सत्यशोधक विवाह सोहळा झाला आहे.
वीर जवानांच्या पत्नींचा सन्मान-
या पुरोगामी, सत्यशोधक पद्धतीच्या सोहळ्यानिमित्ताने देशसेवा बजावणाऱ्या वीर जवानांच्या कुटुंबीयांचा आणि त्यांच्या पत्नींचा गौरव करण्यात आला. देशसेवेबद्दल प्रेम व्यक्त करण्याच्या दृष्टीने आणि प्रेरणा मिळण्याच्या उद्देशाने यावेळी जिल्ह्यातील सुमारे दहा वीर जवानांच्या पत्नींच्या गौरव करण्यात आला.
इतिहास संशोधक कोकाटेनी लावली उपस्थिती
या सत्यशोधक विवाह सोहळ्यासाठी इतिहास संशोधक श्रीमंत कोकाटे यांनी उपस्थिती लावली होती. यावेळी ते म्हणाले, आजच्या समाजाला फुले, शाहू, आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या विचारांची गरज आहे. या पद्धतीने लग्न पार पडल्यास अनेक अनिष्ट चालीरीतींना मूठमाती मिळेल. याशिवाय खर्चात सुद्धा मोठी कपात होईल. त्यामुळे समाजाने सत्यशोधक विवाह पद्धतीचा अवलंब करण्याची गरज आहे.
तरुणांनो सत्यशोधक विवाह करा-
सत्यशोधक पद्धतीच्या मार्गाने लग्नाच्या गाठी बांधल्यानंतर नवदाम्पत्याने लग्नसोहळ्याबद्दल आनंद व्यक्त केला. नववधू स्नेहलता म्हणाली, आपले लग्न धुमधडाक्यात व्हावं, असं प्रत्येक मुलीची इच्छा असतं, पण माझं सत्यशोधक पद्धतीने झालं. त्याचा मला अभिमान आणि खूप आनंद होत आहे.
नवरदेव महादेव म्हणाला, आपल्या भूमितील थोर समाजसुधारकांच्या प्रेरणेतून आपण सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्याचा निर्णय घेतला. आपले काका ए. डी. पाटील आणि गायकवाड सर यांची प्रेरणा मिळाली. सत्यशोधक पद्धतीने विवाह करण्याचा मला खूप आनंद होत आहे. प्रत्येक तरुणांनी सुद्धा आपल्या थोर पुरुषांनी आणि समाजसुधारकांनी जो संदेश दिला आहे, त्याप्रमाणे वागले पाहिजे आणि या थोर पुरुषांना व समाजसुधारकांना श्रद्धांजली म्हणून सत्यशोधक पद्धतीने विवाह केला पाहिजे, असे आवाहन यावेळी महादेव पाटील याने केले.
कोरोना संकटातील आदर्श लग्न..!
कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर या विवाहाच्या निमित्ताने कोरोना जागृतीचे सामाजिक संदेशही देण्यात आले. तसेच सत्यशोधक लग्न सोहळ्याच्या माध्यमातून कोरोनाच्या संकटात खर्चिक लग्नसोहळा टाळण्याचा एक आदर्शही निर्माण होऊ शकतो, असे पाटील कुटुंबाने दाखवून दिले.