सांगली- शिवसेनेचाच मुख्यमंत्री व्हावा, यासाठी विठ्ठलाचरणी साकडे घालत, शपथविधी सोहळ्याला बोलवण्याची व्यक्त केलेली शेतकरी दाम्पत्याची इच्छा अखेर उद्धव ठाकरेंनी दिलेल्या शब्दाप्रमाणे पूर्ण केली आहे. सांगलीच्या जतमधील शेतकरी दाम्पत्याला ठाकरे यांनी मुंबईला शपथविधी सोहळ्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले आहे. त्यानुसार हे दाम्पत्य मुंबईला रवाना झाले आहे.
हेही वाचा -महाराष्ट्राला दुसऱ्यांदा मिळणार मुंबईचा मुख्यमंत्री; मात्र, दोन्ही शिवसेनेचेच
सांगलीच्या जत तालुक्यातील संजय सावंत आणि त्यांची पत्नी रुपाली सावंत हे वारकरी दाम्पत्य शेतकरी आहेत. शिवसेनेचा मुख्यमंत्री व्हावा म्हणून, ५ दिवस निरंकार उपवास करत 85 किलोमीटर अनवाणी पायाने विठ्ठल दर्शनाला हे दोघे पंढरपूरला गेले होते. यादरम्यान, उद्धव ठाकरे 15 नोव्हेंबरला सांगलीमधील खानापूर, कडेगावमधील पावसाने नुकसान झालेल्या शेतीची पाहणी दौऱ्यावर आले होते. त्यावेळी कडेगाव तालुक्यात सावंत यांनी उद्धव ठाकरे यांना भेटून पंढरपूरमधून आणलेली तुळशीची माळ आणि चंद्रभागेमधील तीर्थ भेट दिले होते. यावेळी संजय सावंत यांनी शिवसेनेचा मुख्यमंत्री शपथ घेत असताना मला मंचासमोर जवळ उभं करा, अशी विनंती उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.