सांगली - स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भित्रा म्हणणाऱ्याला संसदेत पाठवू नका, असे आवाहन करत शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राहुल गांधी यांच्यावर टीका केली. इस्लामपूरमध्ये आयोजित हातकणंगले मतदार संघातील महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले मतदारसंघात शिवसेनेकडून धैर्यशील माने हे निवडणूक लढवत आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी यांच्या विरोधात माने यांची लढत आहे. गेल्या वेळी युतीकडून लढणारे राजू शेट्टी यावेळी काँग्रेस महाआघाडीमधून निवडणूक लढवत असून त्यांच्या विरोधात युतीच्या धैर्यशील माने यांनी चांगलीच टक्कर देण्यास सुरुवात केली आहे. आज धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ सांगलीच्या इस्लामपूरमध्ये महायुतीची विजय संकल्प सभा झाली. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची या सभेला प्रमुख उपस्थिती होती. या सभेसाठी शिवसेनेचे नेते व परिवहन मंत्री दिवाकर रावते, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार शिवाजीराव नाईक, हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार धैर्यशील माने यांच्यासह शिवसेना आणि भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.