सांगली -जत तालुक्यातील उमदी येथे बोर नदीच्या ओढा पात्रात पोहायला गेलेल्या दोन सख्ख्या बहिणींचा बुडून मृत्यू झाला आहे. तर बुडणाऱ्या 6 वर्षीय भावाला वाचवण्यात यश आले आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने दोघी बुडल्या, असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आई-वडील शेतमजूरीसाठी गेले असता बहीण-भावंडे बोर नदीच्या पात्रात अंघोळीसाठी गेले होते. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडली आहे.
चिमुकल्या सख्ख्या बहिणींचा मृत्यू, भाऊ बचावला -
काही दिवसांपासून उमदी गावात बोर नदीच्या ओढ्यालगत ऐवळे कुटुंब राहत आहे. मोलमजुरी करून ऐवळे कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. नेहमीप्रमाणे शिवानंद ऐवळे आपल्या पत्नीसह शेतात मजुरीकामासाठी गेले होते. त्यामुळे घरात त्यांच्या दोन मुली व एक मुलगा होता. रविवारी दुपारच्या सुमारास आंघोळ करण्यासाठी दोन्ही बहीणी व त्यांच्या भाऊ असे तिघे मिळून बोर नदीच्या ओढा पात्रात पोहचले. यावेळी पाण्यात उतरल्यानंतर पाण्याचा अंदाज न आल्याने रेणुका शिवानंद ऐवळे (७) व लक्ष्मी शिवानंद ऐवळे (१२) या दोन्ही सख्ख्या बहीणी पाण्यात बुडाल्या. त्याचवेळी त्यांच्या सोबत पोहणारा लहान भाऊ मायाप्पा शिवानंद ऐवळे (६) हा देखील यावेळी पाण्यात बुडू लागला होता. त्याने आरोड सुरू केला. त्यावेळी ओढ्या लगत जनावरे राखणारा संभाजी माने या युवकाने पाहिल्यानंतर त्यांने तत्काळ उडी घेत, बुडणाऱ्या तिघांना बाहेर काढले. मात्र दोघी बहिणींचा मृत्यू झाला होता. या घटनेची नोंद उमदी पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
हेही वाचा - धक्कादायक : नाशिकमध्ये दुचाकी अडवून महिलेवर बलात्कार