सांगली - हृदय विकाराचा तीव्र झटका आलेल्या मित्राला मिरज येथील रूग्णालयात दाखल करण्यासाठी जात असताना गाडीचा ताबा सुटून अपघात झाला. या अपघातात दोन जण जागीच ठार, तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मिरज-पंढरपूर मार्गावरील कुची येथे हा भीषण अपघात घडला. मृत आणि जखमी हे सोलापूर जिल्ह्यातील आहेत.
या अपघातात चालक लक्ष्मण आण्णाप्पा चंदनवाले (वय 35) आणि रामचंद्र हणमंत वाघ (वय 32) हे जागीच ठार झाले. रेवण आप्पाराव वाघ (वय 48) आणि नागेश कानिफनाथ मोरे (वय 23) हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. जखमीवर मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.