सांगली- महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सहायक कर निरीक्षक पदाच्या परीक्षेसाठी बोगस कागदपत्रे तयार करुन आयोगाची फसवणूक केल्याप्रकरणी सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने दोघा सहायक कर निरीक्षकांना अटक केली आहे. भास्कर माधव तास्के, (वय 35 वर्षे, रा. वाकोली, ता. कळमनुरी, जि.हिंगोली) आणि इंद्रजीत बाळासाहेब माने (वय 29 वर्षे, रा. बहादूरवाडी, सांगली), अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. या दोघांना न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
बोगस कागदपत्रे देऊन फसवणूक
फसवणुकीचा प्रकार सहा वर्षांपूर्वी घडला होता. माने यांनी बोगस कागदपत्रे तयार करून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेच्यावेळी भास्कर तास्के यांना मदत केली होती. या परीक्षेत तास्के राज्यात दुसरा आला होता. त्याची लातूर येथे सहायक कर निरीक्षक पदावर नियुक्ती झाली होती. त्यानंतर इंद्रजीत माने हादेखील सहायक कर निरीक्षक पदाची परीक्षा उत्तीर्ण झाला होता, त्याची नियुक्ती मुंबई येथे झाली होती. आयोगाला परीक्षेतील बोगस कागदपत्राची माहिती मिळाली, दिनांक 1 एप्रिल, 2019 रोजी आयोगाचे उपसचिव सुनील अवताडे यांनी माने व तास्के या दोघांविरोधात इस्लामपूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.