सांगली -चाळीस हजार रुपयांची लाच घेताना जीएसटी विभागाच्या राज्य अधिकाऱ्यासह दोघांना अटक करण्यात आली. मुल्यवर्धित करातील त्रुटी दूर करण्यासाठी त्यांनी एका तक्रारदाराकडे लाचेची मागणी केली होती. कार्यालयातच लाचेची रक्कम स्वीकारताना दोघा अधिकाऱ्यांना रंगेहात ताब्यात घेण्यात आले. (जीएसटी) राज्यकर अधिकारी राजेंद्र महालिंग खोत यांच्यासह कर सहायक शिवाजी महादेव कांबळे अशी अटक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. कवठेमहांकाळ येथील एका तक्रारदाराकडून लाच घेताना, ही कारवाई करण्यात आली आहे.
40 हजारांची लाच घेताना जीएसटीचे राज्य कर अधिकाऱ्यासह दोघांना अटक - Sangli Police News
चाळीस हजार रुपयांची लाच घेताना जीएसटी विभागाच्या राज्य अधिकाऱ्यासह दोघांना अटक करण्यात आली. या दोघान विरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तक्रारदार यांच्या पत्नीचे कवठेमहांकाळ येथे बसवेश्वर इंडस्ट्रीज आहे. त्याठिकाणी फर्निचर तयार केले जाते या कारखान्याच्या मागील तीन वर्षाचा मुल्यवर्धित कर मार्च 2019 मध्ये ऑनलाईन पद्धतीने भरलेला आहे. मात्र, जीएसटी कार्यालयातील राजेंद्र खोत व शिवाजी कांबळे यांनी तक्रारदार यांच्याशी संपर्क साधत आपण भरलेल्या मुल्य वर्धीत करात त्रुटी निघण्याची शक्यता आहे. त्यामुळे या त्रुटी दूर करायच्या असतील तर तुम्हाला 1 लाख रुपये द्यावे लागतील, अशी लाचेची मागणी केली. यानंतर चर्चेअंती 60 हजारांवर तोडगा निघाला. मात्र, तक्रारदार यांनी सांगलीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात याबाबत तक्रार केली. त्यानुसार पडताळणी करत बुधवारी जीएसटी विभागात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचत राज्यकर अधिकारी राजेंद्र खोत आणि कर सहायक शिवाजी कांबळे यांना चाळीस हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या दोघांविरोधात संजयनगर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जीएसटी विभागात प्रथमच अशी घटना घडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.