सांगली- जिल्ह्यात रविवारी तब्बल २० नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर ४ जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे, जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या २४२ झाली आहे. यातील १२१ जण कोरोनामुक्त झाले असून आठ जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात शिराळा तालुक्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत.
रविवारी दुपारपर्यंत २० जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. हे सर्व रुग्ण मुंबईहून आलेले किंवा मुंबईहून आलेल्या कोरोनाबाधितांच्या संपर्कात आलेले आहेत. यामध्ये शिराळा तालुक्यातील मणदूर या एकाच गावातील नऊ जणांचा समावेश आहे. तर, खानापूर तालुक्यातील भाळवणी, वाळवा तालुक्यातील वाटेगांव, येलूर इस्लामपूर, तासगाव तालुक्यातील गव्हाण, माजर्डे, पलूस तालुक्यातील दुधोंडी, कवठेमहांकाळ आणि जत तालुक्यातील अंकली येथील रुग्णांचा समावेश आहे. सर्वांना मिरजेच्या कृष्णा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.