सांगली - शेतकऱ्यांच्या एकरी एक क्विंटल तूर खरेदी करण्याच्या सरकारच्या फतव्याने सांगलीतील तूर उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे. गेल्या दोन दिवसांपासून अतिरिक्त तूर खरेदीचा वाद निर्माण झाल्याने सांगली बाजार समितीने तूर खरेदी केंद्र बंद केले आहे.
राज्य सरकारने तूर उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति एकरी एक क्विंटल तूर खरेदीचा आदेश बाजार समित्यांना धाडला आहे. बाजारात सध्या तुरीचा भाव 4 हजार 500 ते 5 हजार रुपयांपर्यंत खाली आला आहे. तर, तुरीचा हमीभाव क्विंटलला 5 हजार 800 रुपये आहे. भाव पडल्याने नाफेड व महाराष्ट्र स्टेट को-ऑप. मार्केटिंग फेडरेशनतर्फे विष्णूअण्णा पाटील खरेदी-विक्री संघ मार्केट यार्ड सांगली येथे सोमवारी तूर खरेदी केंद्र सुरू झाले. मात्र, शासनाने प्रति शेतकरी हेक्टरी 2.57 क्विंटल तूर खरेदीचे निर्देश दिलेले आहेत. त्यानुसार तूर खरेदी होणार आहे. यामुळे जिल्ह्यातील तूर उत्पादक शेतकऱ्यांची मोठी अडचण निर्माण झाली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे सांगलीत शेतकरी आणि बाजार समितीमध्ये वाद निर्माण झाला आहे. मोठया प्रमाणात शेतकऱ्यांची अतिरिक्त तूर शिल्लक आहे, आणि ती कुठे विकायची असा प्रश्न निर्माण झाला आहे.
सन 2017-18 च्या हंगामासाठी एकरी 10 क्विंटल, सन 2018-19 च्या हंगामासाठी एकरी 5 क्विंटल आणि आता सन 2019-20 च्या हंगामासाठी एकरी एक क्विंटलच तूर खरेदीचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे शेतकऱ्यांनी सरसकट तूर खरेदी करावा अन्यथा एक किलोही तूर देणार नाही, असा पवित्रा शेतकऱ्यांनी. घेतला आहे. त्यामुळे दोन दिवस तूर खरेदीच बंद आहे. केंद्र चालू पण खरेदी बंद अशीच स्थिती सध्या आहे. जत तालुक्यातून तुरीची पोती घेऊन आलेली तीन वाहने मार्केट यार्डात खरेदी केंद्रासमोर थांबून आहेत. यामुळे तूर खरेदीही नाही आणि वाहन भाड्याचा भूर्दंड, असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसत आहे.