सांगली -ओढ्याला आलेल्या पुराच्या पाण्यात गाडी घालणे एका ट्रक चालकाला चांगलेच महागात पडले आहे. चालकाला पुलावरील पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक पलटी झाला आहे. खानापूरच्या करंजे येथे ही घटना घडली. घटनेचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
खानापूर तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून धुंवाधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे करंजे गावाजवळून वाहणाऱ्या अग्रणी नदीला पूर आला आहे. तेथील ओढ्यावरून पाणी वाहु लागल्याने या ठिकाणची वाहतूक बंद झाली आहे. आज सकाळच्या सुमारास आटपाडीवरून आलेल्या तेलाच्या टँकर चालकाने धाडसाने या पाण्यातून गाडी बाहेर काढली. त्यानंतर समोरून येणाऱ्या ट्रक चालकानेही पुराच्या पाण्यातून गाडी घालण्याचे धाडस केले. मात्र, रस्त्याचा अंदाज न आल्याने ट्रक काही अंतरावर जाऊन पाण्यात पलटी झाला.