सांगली- लॉकडाऊनचे निर्बंध झुगारून शहरातल्या व्यापाऱ्यांनी आपली दुकाने उघडली आहेत. सातत्याने घालण्यात येणाऱ्या निर्बंधांना विरोध करत व्यापाऱ्यांनी हे पाऊल उचलले आहे. तर प्रशासनाकडून कारवाईची भूमिका घेतल्यास कुटुंबासह रस्त्यावर उतरण्याचा इशारा व्यापारी वर्गाच्या वतीने देण्यात आला आहे.
जिल्ह्याचा चौथ्या स्तरात समावेश
सांगली जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट हा 10 टक्क्यांहून अधिक असल्याने जिल्ह्यात अद्याप चौथ्या स्तराचे निर्बंध लागू आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेला परवानगी आहे. त्यामुळे इतर दुकाने हे बंद आहेत. मात्र व्यापाऱ्यांनी कडक निर्बंधांना विरोध सुरू केला आहे. महापालिका क्षेत्रातल्या असणाऱ्या पॉझिटिव्हिटी रेटनुसार निर्बंध हटवण्यात यावे, अशी मागणी व्यापारी वर्गाकडून करण्यात येत आहे. मात्र जिल्ह्याच्या पॉझिटिव्हिटीनुसार प्रशासनाने चौथा स्तर कायम ठेवला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेला परवानगी देत, इतर बाबींवर निर्बंध कायम ठेवले आहेत. सोमवारपासून निर्बंध आणखी काही दिवस वाढवण्यात आले आहेत.
अखेर, निर्बंध झुगारून दुकाने उघडली
मात्र, दुसर्या बाजूला महापालिका क्षेत्रातल्या व्यापाऱ्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. मिरजेतील व्यापाऱ्यांनी प्रशासनाचे निर्बंध झुगारून आज सोमवारपासून आपली दुकाने उघडली आहेत. मी मिरजकर फाउंडेशनच्या माध्यमातून मिरजेतील व्यापाऱ्यांनी एकत्र येत सकाळपासून आपले दुकान उघडून विक्री सुरू केली. व्यापाऱ्यांच्या भूमिकेनंतर पालिका आणि पोलीस प्रशासनाकडून कारवाईची भूमिका घेण्यात येत आहेत. मात्र व्यापाऱ्यांचा आक्रमक पवित्रा पाहता प्रशासनाने थेट कारवाई करण्याऐवजी सुरू असलेल्या आस्थापनांचे व्हिडिओ चित्रीकरण करण्यात येत आहे.