सांगलीत आणखी तीन कोविड-19 पॉझिटिव्ह, तर एक कोरोनामुक्त; जिल्ह्यात 'अॅक्टिव्ह' रुग्ण ३६
जिल्ह्यात सद्यस्थितीत ३६ रुग्ण उपचार घेत असून ४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, आजअखेर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी चौघांची स्थिती चिंताजनक आहे. तसेच, एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे.
सांगली - जिल्ह्यात सोमवारी कोरोनाचे आणखी ३ रुग्ण आढळले आहेत. मुंबईहून आलेले दोघे आणि त्यांच्यापैकी एकाच्या संपर्कात आलेल्या एका व्यक्तीचा असे तीन अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर एक जण कोरोनामुक्त झाला आहे. यासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ३६ झाला आहे.
जिल्ह्यात आढळलेल्या तिघांपैकी एक व्यक्ती वाळवा तालुक्यातील आष्टा येथील झोळंबी वसाहतीमध्ये राहते. या महिलेचा पती २३ मे रोजी मुंबईहून आला होता. त्याचा अहवाल २४ मे रोजी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्याच्या पत्नीची कोरोना चाचणी केली असता तिचाही अहवाल सोमवारी पॉझिटिव्ह आला. तर, दुसरी बाधित व्यक्ती आटपाडी तालुक्यातील खरसुंडी नजिकच्या कामत येथील रहिवासी आहे. ही ६५ वर्षीय व्यक्ती २३ मे रोजी मुंबईहून आली होती. तपासणी अहवालात त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
वाळवा तालुक्यातील कुंडलवाडी येथे मुंबईहून १५ मे रोजी आलेल्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाली होती. त्या व्यक्तीच्या संपर्कात असलेल्या सर्वांना वाळवा येथील संस्थात्मक अलगीकरणात दाखल करण्यात आले होते. त्यापैकी कोरोना बाधिताच्या ५७ वर्षीय वडिलांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे.
जिल्ह्यात सद्यस्थितीत ३६ रुग्ण उपचार घेत असून आज अखेर ४८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, आजअखेर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८५ रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांपैकी चौघांची स्थिती चिंताजनक आहे. तसेच, एक रुग्ण कोरोनामुक्त झाला आहे.
प्रकृती चिंताजनक असलेल्यांमध्ये कवठेमहांकाळ तालुक्यातील नागोळे येथील ४८ वर्षीय व्यक्ती, शिराळा तालुक्यातील मोहरे येथील ५० वर्षीय व्यक्ती, खिरवडे येथील ५६ वर्षाची व्यक्ती आणि मुंबईतील धारावी ते मालगाव बसने आलेल्यांपैकी ७५ वर्षीय महिला यांचा समावेश आहे. हे सर्व रुग्ण अतिदक्षता विभागात विशेष उपचारांखाली आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ अभिजित चौधरी यांनी दिली.