मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने आयएल आणि एफएस प्रकरणात दुसरा समन्स पाठवला आहे. ईडीने जयंत पाटील यांना आज चौकशीसाठी बोलवले आहे. दरम्यान जयंत पाटील यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. कार्यकर्त्यांनी ईडीच्या कार्यालयाबाहेर बॅनरबाजी केली आहे. तर मुंबईतील राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर मोठी घोषणाबाजी करण्यात येत आहे. जयंत पाटील चौकशीसाठी ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. जयंत पाटील यांनी आपल्या कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयाकडे फरकू नये, असे आवाहनही केले आहे. मात्र तरीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन केले आहे.
चौकशीसाठी आधीही बोलवले होते : दरम्यान ईडीने आधी 15 मे रोजी चौकशी हजर राहण्याचे आदेश नोटीसमध्ये दिले होते. परंतु आपल्याला नातेवाईकांच्या लग्न समारंभात जायचे आहे, यामुळे चौकशीसाठी येऊ शकत नसल्याचे जयंत पाटील यांनी ईडीला सांगितले होते आणि मुदत वाढची विनंती केली होती. दरम्यान ईडीने जयंत पाटील यांची विनंती मान्य करत त्यांना 22 मेपर्यंत मुदत वाढवून दिली होती. यामुळे आज ईडीच्या चौकशीसाठी जयंत पाटील यांना जावे लागणार आहे.
ईडी कोणत्या प्रकरणात चौकशी करत आहे : ईडी आयएल आणि एफएस या कंपनीच्या व्यवहारांची चौकशी करत आहे. या कंपनीने आपली दिवाळखोरी जाहीर केली होती. या कंपनीच्या मदतीने मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला जात आहे. दरम्यान, मनसे पक्षाचे प्रमुख राज ठाकरेंनाही याच कंपनी प्रकरणात ईडीने नोटीस पाठवली होती. कंपनीच्या आर्थिक व्यवहारात अनियमिता होती त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर अरुणकुमार साहा यांना ताब्यात घेवून मिळालेल्या माहितीनुसार, अनेक लोकाची नावे बाहेर आली होती. यात जयंत पाटील यांचेही नाव होते. जयंत पाटील यांच्यामागे ईडीच्या चौकशीचा सासेमिरा लागला आहे. राज्यातील सत्तासंघर्षाचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लागला, त्याच दिवशी ईडीने जयंत पाटील यांना नोटीस पाठवली होती. ईडीच्या चौकशीची नोटीस जयंत पाटील यांना आल्यानंतर राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती.