सांगली- कोलकत्याचा एक 'टायगर' सांगलीमध्ये क्वारंटाईन झाला आहे. ऐकून थोडं नवल वाटलं, पण खरं आहे. लॉकडाऊनमुळे हा श्वान तब्बल २ हजार किलोमीटरचा प्रवास करत कोलकतामधून सांगलीच्या बेणापूरमध्ये पोहोचला आहे. त्यानंतर आपल्या मालकासोबत क्वारंटाईन होऊन राहत आहे.
आता श्वानही क्वारंटाईन!!! कोलकात्याचा 'टायगर' सांगलीत पोहोचला अन् झाला क्वारंटाईन कोरोनाच्या परस्थितीमुळे सगळीकडे लॉकडाऊन आहे. अशा स्थितीत नागरिक स्थलांतर करत आहेत. मिळेल त्या वाहनाने, पायी अशा अनेक मार्गाने फक्त आपल्या मुला-बाळांना घेऊन आपल्या गावी पोहोचत आहेत. मात्र, कोलकाता येथील एक कुटुंब सांगलीच्या बेणापूरमध्ये चक्क आपल्या सोबत श्वान घेऊन पोहोचले आहे.
मूळचे खानापूर तालुक्यातील बेणापूरचे असलेले हे कुटुंब सोन्या-चांदीच्या व्यवसायाच्या निमित्ताने कोलकातामध्ये स्थायिक झालेले आहेत. तर पश्चिम बंगाल गलाई बांधव असोसिएशनचे ते अध्यक्ष सुद्धा आहेत. त्यांच्या कुटुंबापैकी एक सदस्य आहे, रॉट व्हिलर जातीचा 4 वर्षांचा टायगर. हा टायगर तसा कोलकाता मधीलच आहे. २ महिन्याचा असताना तो या कुटुंबात दाखल झाला आणि त्याचे टायगर असे नामकरण करण्यात आले. तेव्हापासून टायगर यांचा कुटुंबाचा सद्स्य बनला आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे या कुटुंबीयांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला. पण प्रश्न होता, टायगरचे काय करायचे? त्याला येथेच ठेऊन गेलो तर त्याची निगा कोण राखणार? आजपर्यंत टायगरला कुठेही न सोडल्याने आता आपण गावी गेलो, तर त्याची काळजी कोण घेणार? हा प्रश्न या कुटुंबासमोर आला. टायगरला लळा लागलेल्या या कुटुंबाने त्याला घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. मात्र, पुन्हा त्यांच्यासमोर एक प्रश्न निर्माण झाला. कारण त्यांच्याकडे एकच गाडी होती आणी त्यातून त्याला घेऊन जाणे शक्य नव्हते. त्यामुळे या कुटुंबीयांनी टायगरला सोबत घेऊन जाण्यासाठी एक मिनी बस भाड्याने घेतली. कोलकातामधून तब्बल २ हजार किलोमीटरचा प्रवास करत ते सांगली जिल्ह्यात पोहोचले.
प्रशासनाने सांगितले क्वारंटाईन होण्यास . . . .
या कुटुंबीयांना प्रशासनाने क्वारंटाईन होण्यास सांगितले. मग यांच्यासोबत त्यांचा टायगरही क्वारंटाईन झाला आहे. सध्या बेणापूर गावामध्ये आपल्या मालकासोबत माळरानावरील वस्तीवर टायगर राहत आहे. तसे त्याला या खानापूर घाटमाथ्यावरच्या उन्हाचा कडाका सुद्धा सहन होत नाही. पण काय करणार, त्याच्यावर वेळच अशी आली. आता हा उन्हाचा तडाखा सहन करायलाच पाहिजे. सध्या टायगर यासर्व परस्थितीशी जुळवत आता माळरानावर क्वारंटाईनमध्ये अगदी निवांत राहत आहे.
लॉकडाऊनमुळे माणसाबरोबरच प्राण्यांचे देखील स्थलांतर झाले आहे. जशी माणसे या भागातून त्या भागात गेल्यानंतर त्या परिस्थितीशी जुळवून घेत आहेत. अगदी त्याच प्रकारे हे प्राणी देखील नवीन असलेल्या परिस्थितीशी जुळवून घेऊन कोरोनापासून जीव वाचवत आहेत.