सांगली - कालव्यातून तीन भावंड वाहून गेल्याची धक्कादायक घटना आटपाडीच्या घानंद येथे घडली आहे. दोघे सख्खी व एक चुलत भाऊ, अशी तिघे भावंड पाण्यात बुडल्याची घटना समोर आली आहे. मासे पकडण्यासाठी गेले असताना ही घटना घडली असून, रात्री उशिरापर्यंत तिघा भावंडांना शोधण्याचे काम सुरू होते. आटपाडी तालुक्यातील घानंद येथील एकाच कुटुंबातील ही तिघे भावंड आहेत. अंकुश व्हनमाने, (वय, १६) आनंदा अंकुश व्हनमाने (वय,१५) हे सख्खे भाऊ आणि त्यांचा चुलत भाऊ वैभव लहू व्हनमाने, (वय, १७) अशी वाहून गेलेल्या मुलांची नावे आहेत.
कुत्रा मृत अवस्थेत आढळल्याने खुलासा
रविवार दुपारपासून हे तिघे भावंड गायब झाली होती. सायंकाळी बऱ्याच शोध घेतला असता, गावातील घाणंद तलावाच्या सांडव्याच्या कालव्यालगत दोन मुलांची कपडे आणि चपला आढळून आल्या. त्यानंतर हे तिघे पाण्यातून वाहून गेल्याची बाब लक्षात आली. तसेच, काही अंतरावर कुत्र्याचा मृतदेह आढळून आला.
मासेमारीसाठी गेले असताना घडली घटना
घानंद तलावात सध्या मोठ्या प्रमाणात पाणी आहे. कालव्याच्या शेजारी अंकुश व्हनमाने आणि लहू व्हनमाने या दोन सख्ख्या भावाची शेत जमीन आहे. नेहमीप्रमाणे रविवारी दुपारच्या सुमारास विजय अंकुश व्हनमाने, आनंदा अंकुश व्हनमाने हे सख्खे भाऊ आणि त्यांचा चुलत भाऊ वैभव लहू व्हनमाने घरातील कुत्रे घेऊन त्याला आंघोळ घालण्यासह मासेमारीसाठी गेले होते. त्यावेळी ही घटना घडली. या घटनेमुळे तालुक्यात खळबळ उडाली असून गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान, या तिघा भावंडांचा शोध घेण्याचे काम रात्री उशीरापर्यंत सुरू होते.