सांगली - सांगलीच्या आटपाडी येथे आठ महिन्यापूर्वी झालेल्या एका लुटीचा सांगली पोलिसांनी छडा लावला आहे. एका खासगी कंपनीचे साडेअकरा लाख रुपये लूटण्यात आले होते. याप्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एका टोळीचा पर्दाफाश करत सहा लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. मोहन शिंदे हे व्यक्ती बँकेत पैसे जमा करायला चालले असताना, त्यांची चोरट्यानी लूट केल्याची घटना घडली होती.
सांगली पोलिसांकडून आठ महिन्यापूर्वीच्या ११ लाख रुपये लुटीचा छडा; तीन जणांना अटक - सांगली पोलीस कारवाई
मोहन शिंदे या व्यक्ताचा दोन दुचाकीवरून पाठलाग करत आलेल्या चोरट्यांनी शिंदे यांना अडवून मारहाण केली होती. तसेच त्यांच्याकडील रोकड लंपास केली होती. याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांनी यश आले आहे.
सांगलीच्या आटपाडी येथील मोहन शिंदे हे एका खासगी कंपनीकडे फ्लिपकार्ट एलआयसी डिलिव्हरी कंपनी आणि एक्सप्रेस कंपनीचे रोकड जमा करण्याचे काम करायचे. दरम्यान, ऑक्टोंबर २०१९ रोजी दुपारच्या सुमारास शिंदे हे कंपनीची ११ लाख ६२ हजार रुपयांची रोकड घेऊन बँकेत भरण्यासाठी करगणी निघाले होते. यावेळी त्यांचा पाठलाग करत आलेल्या दोन दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी शिंदे यांना अडवून मारहाण करून त्यांच्याकडील रोकड लंपास केली होती. याप्रकरणी आटपाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
गेल्या आठ महिन्यांपासून आटपाडी पोलीस तपास करत होते. दरम्यान, या चोरीचा तपास जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला दिला होता. या शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीकांत पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आठ महिन्यापूर्वी केलेल्या या लुटीचा अखेर छडा लावण्यात आला आहे. याप्रकरणी सांगलीच्या माधवनगर या ठिकाणाहून तिघा जणांना ताब्यात घेण्यात आले होते. त्यांच्याकडे सखोल चौकशी केली असता या तिघांनी आटपाडी येथील कंपनीचे साडेअकरा लाखांची लूट केल्याचे कबुल केले आहे. या तिघा संशयितांकडून ४ लाख १० हजारांची रोकड, तीन महागडे मोबाईल, एक मोटरसायकल असा एकूण ६ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत तिघांनाही अटक करण्यात आली आहे.