सांगली - मिरज तालुक्यातील टाकळी येथील एकाच कुटुंबातील 3 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याची आणखी एक घटना घडली आहे. मुलगा,आई आणि काका अशा तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याच सुन्न करणारी घटना समोर आली आहे. मृत कुटुंबाच्या नातेवाईकांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती लपवल्याने संसर्ग होऊन ही घटना घडल्याची चर्चा आहे.
जिल्ह्यात एकापाठोपाठ तीन कुटुंब उध्वस्त
कोरोनामुळे जिल्ह्यात अनेक कुटुंब उद्धवस्त होण्याच्या घटना समोर येत आहेत. शिराळा तालुक्यातील शिरशी याठिकाणी आई,वडील आणि मुलगा अशा तिघांचा मृत्यू झाला होता. त्यापाठोपाठ कडेगाव तालुक्यातील तांडोली येथील आई,वडील आणि त्यांची दोन मोठे मुलं कोरोनाना मृत्युमुखी पडल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे जिल्हा हादरलेला असताना आता मिरज तालुक्यातील टाकळी येथील एकाच कुटुंबातील 3 जणांचा मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. गावातील बाहुबली पाटील, त्यांची आई व काका या तिघांचा एकापाठोपाठ मृत्यू झाला आहे.
नातेवाइकांनी कोरोना झाल्याची माहिती लपविली
टाकळी येथील बाहुबली पाटील हे काही दिवसांपूर्वी त्यांच्या नातेवाईकांची तब्बेत बिघडल्याने त्यांना पाहण्यासाठी गेले होते. मात्र ज्यांना पाहण्यासाठी गेले होते. त्यांना कोरोना झाल्याची माहिती त्यांना देण्यात आली नव्हती, घरी परतल्यानंतर बाहुबली पाटील यांच्यासह त्यांची पत्नी,आई व दोन काका आणि चुलत भावाला कोरोनाची लागण झाल्याची चर्चा आहे. तर पाटील कुटुंबाने सुरुवातीला सौम्य लक्षणे असल्याने त्यांनी घरीच उपचार घेतले होते.
परिसरात हळहळ
बाहुबली पाटील यांच्यासह कुटुंबाची प्रकृती बिघडली. त्यामुळे सर्वांना कोल्हापूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर बाहुबली पाटील यांच्या पत्नीही पॉझिटिव्ह आल्या, पण सौम्य लक्षणे असल्याने त्यांनी घरीच उपचार सुरू केले. दरम्यान उपचार सुरू असताना बाहुबली पाटील यांच्या आईचे निधन झाले. त्यापाठोपाठ काही दिवसातच बाहुबली यांच्या काकांचे निधन झाले. त्यानंतर बाहुबली पाटील यांचेही निधन झाले. एकापाठोपाठ एक तिघांच्या निधनाने पाटील कुटुंबीयांवर दुःखाचे डोंगर कोसळले आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.