महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

धक्कादायक..! मिरज शासकीय रुग्णालयातील 3 रुग्णांना फेकले रस्त्यावर, एकाचा मृत्यू - मिरज शासकीय रुग्णालय

मिरज शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 3 रुग्णांना रस्त्यावर फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

रस्त्यावर पडलेले रुग्ण

By

Published : Nov 4, 2019, 8:17 PM IST

सांगली- माणुसकीला काळीमा फासणारी घटना सांगलीच्या मिरजमध्ये घडली आहे. मिरज शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या 3 रुग्णांना रस्त्यावर फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यानंतर पुन्हा सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शिवसेनेने हा प्रकार समोर आणत दोषी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याची मागणी केली आहे.

मिरज शासकीय रुग्णालयातील 3 रुग्णांना फेकले रस्त्यावर


मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचार घेणाऱ्या तिघा रुग्णांना सांगलीत एका निर्जन रस्त्यावर फेकून देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर या पैकी एकाच उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे. हा सर्व प्रकार शिवसेनेने चव्हाट्यावर आणला आहे. काही दिवसांपूर्वी मिरजेतील शासकीय रुग्णालयात शिवलिंग कुचणुरे (रा. गणेशवाडी, ता. शिरोळ, कोल्हापूर), इर्शाद मोमीन (रा.मिरज) आणि शंकर मारुती शिंदे (रा.धारावी, मुंबई) यांच्यावर उपचार सुरू होते. हे तीनही रुग्ण 2 नोव्हेंबर रोजी सांगलीच्या जुना कुपवाड रोडवर असणाऱ्या सुंदर पार्क येथील निर्जन रस्त्यावर रात्रीच्या सुमारास मरणासन्न अवस्थेत पडले होते.

यावेळी परिसरात तीन जणांचे मृतदेह पडले असल्याची अफवा पसरली. या अफवेची शहानिशा करण्यासाठी याठिकाणी शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शंभूराजे काटकर यांनी धाव घेतली. त्यावेळी त्यांना तिघे जिवंत असल्याचे आढळून आले. त्यानंतर काटकर यांनी या तिघांची विचारपूस केली असता आपण मिरजेच्या शासकीय रुग्णालयात अ‌ॅडमिट होतो आणि त्याठिकाणी असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी डिस्चार्ज करून दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जाणार असल्याचे सांगत आपणाला याठिकाणी सोडून निघून गेल्याची माहिती दिली. यानंतर काटकर यांनी सावली निवारा केंद्राचे मुस्तफा मुजावर यांच्या मदतीने या तिघांना सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. दरम्यान, यापैकी शिवलिंग कुचणुरे (रा.गणेशवाडी, ता. शिरोळ, जि.कोल्हापूर) याचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला आहे.

या घटनेनंतर मयताच्या नातेवाईकांनी सांगलीच्या रुग्णालयात धाव घेतली. यावेळी नातेवाईकांना मिरजेच्या शासकीय रुग्णालय प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. उपचार सुरू असताना आम्ही 2 नोव्हेंबरला मिरजेच्या रुग्णालयात पोहचलो असता पेशंटने डिस्चार्ज घेतल्याचे तिथल्या कर्मचाऱ्यांनी सांगितले. त्यामुळे, आम्ही घरी परतलो आणि आज थेट मृत्यूची बातमी पोलिसांकडून कळाल्याचे सांगत, शासकीय रुग्णालयाविरोधात संताप व्यक्त केला.

या प्रकरणी शिवसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. मरणाच्या अवस्थेत असणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्याऐवजी त्यांना रस्त्यावर फेकून देण्याचा मिरज शासकीय रुग्णालयाचा कारभार हा माणुसकीला काळीमा फासणारा असल्याचा आरोप करत या सर्व प्रकाराला जवाबदार आणि मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना नोकरीतून बडतर्फ करत त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करण्याची मागणी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शंभूराजे काटकर यांनी केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details