सांगली- बैलगाडी शर्यती ( Bullock Cart Race ) दरम्यान बैलगाडी भरकटल्याने अपघात होऊन तीन जखमी झाल्याची घटना घडली आहे. पलूस या ठिकाणी धोंडीराज यात्रे निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडी शर्यती दरम्यान हा प्रकार घडला आहे. बैलगाडी चालकाने वेळीच बैलांना आवरल्याने मोठी दुर्घटना टळली आहे.
शर्यती दरम्यान बैलगाडी भरकटली -पलूस या ठिकाणी धोंडीराज महाराजांची यात्रा सुरू आहे.या यात्रे निमित्ताने शुक्रवारी (दि. 29 एप्रिल) शहरामध्ये बैलगाडी शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. या शर्यतीमध्ये सुमारे वीसहून अधिक बैलगाडी चालकांनी सहभाग घेतला होता. दरम्यान, बैलगाडी शर्यत सुरू झाल्यानंतर बैलगाडीचा अपघात घडला. ज्यामध्ये तीन जण जखमी झाले आहेत. शर्यत सुरू झाल्यानंतर बैलगाड्या धावू लागल्या आणि काही अंतरावर गेले असता एका बैलगाडीचा "जु"मोडला. त्यामुळे बैलगाडीवरील चालकाचा ताबा सुटला आणि बैलगाडी भरकटून गर्दीमध्ये घुसली व तीन जणांच्या अंगावरून गेली. यात तीन युवक जखमी झाले. घटनेनंतर जखमींना तत्काळ पलूसच्या ग्रामीण रुग्णालयांमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिघांना किरकोळ दुखापत झाली आहे.