सांगली - मिरजेतील अपेक्सकेअर हॉस्पिटलमधील 87 रुग्ण मृत्यू प्रकरणी तीन रुग्णवाहिका चालकांना अटक करण्यात आली आहे. रूग्ण दाखल करण्यासाठी रुग्णवाहिका चालकांनी 7 हजार रुपये कमिशन घेतल्याचे पोलीस तपासात समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे. तर अपेक्स प्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या 13 झाली आहे. आत्ता पर्यंत 16 नातेवाईकांनी डॉ. महेश जाधव विरोधात तक्रार दिली आहे.
आतापर्यंत 13 जणांना अटक -
अपेक्सकेअर हॉस्पिटलमध्ये कोविड उपचारादरम्यान 87 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर पोलिसांकडून हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर महेश जाधव याच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. याप्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. आतापर्यंत पोलिसांनी दहा जणांना अटक केली. तर आता आणखी तिघांना अटक करण्यात आली आहे. दोन दिवसांपूर्वी डॉ. महेश जाधवच्या डॉक्टर भावालाही अटक करण्यात आली आहे.
रुग्ण दाखल करण्यासाठी कमिशन -
याप्रकरणी आता 3 रुग्णवाहिका चालकांना अटक देखील करण्यात आली आहे. डॉक्टर महेश जाधव हा सदरच्या रुग्ण चालकांना रुग्णालयात रुग्ण दाखल करण्यासाठी सात हजार रुपयांचे कमिशन देत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. यानंतर महात्मा गांधी चौक पोलिसांनी तीन रुग्णवाहिका चालकांना अटक केली आहे. त्याचबरोबर रुग्णालया बरोबर अटकेत असलेल्या रुग्णालयाच्या अकाउंटंट निशा पाटील यांच्या घरावर पोलिसांनी छापा टाकत हस्ताक्षर बाबतचे पुरावे जमा करण्यासाठी काही कागदपत्रे जप्त केली आहेत.
नातेवाईकांच्या तक्रारीत वाढ -
डॉक्टर महेश जाधव याच्यावर पोलिसांकडून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांच्या तपासाची व्याप्ती वाढू लागली आहे. डॉक्टर महेश जाधव याच्या रुग्णालयात मृत्यू झालेल्या अनेक कोरोना रुग्णांचे नातेवाईक महेश जाधव याच्याविरोधात तक्रार देण्यासाठी पुढे येत आहेत. आतापर्यंत 13 नातेवाईकांनी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यामध्ये डॉक्टर महेश जाधव याच्याविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत.