सांगली- ऐन पावसाळ्यात प्रदुषणामुळे कृष्णा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडले आहेत. त्यामुळे नदीकाठी माशांचा खच पडला आहे. कृष्णाकाठी असणाऱ्या काही साखर कारखान्यांमधून सोडण्यात आलेल्या मळी मिश्रित दूषित पाण्यामुळे माशांचा मृत्यू झाल्याचं बोललं जात आहे. मात्र या घटनेमुळे कृष्णाकाठी भीतीचे वातावरण पसरले आहे.
सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत गेल्या तीन दिवसांपासून मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. संततधार पावसामुळे पाणी पातळी वाढली आहे. त्यामुळे कृष्णा नदीमध्ये मोठ्या प्रमाणात मासे सापडत आहेत. कसबे डिग्रस बंधाऱ्यावर मासे सहजतेने हाताला लागत होते. त्यामुळे ग्रामस्थांची मासे पकडण्यासाठी झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले. मात्र आता याच कृष्णा नदीच्या पात्रात मंगळवारी हजारो मासे मृत्यूमुखी पडल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
प्रदुषणामुळे कृष्णा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी ऐन पावसाळ्यात प्रवाहित असणाऱ्या कृष्णेच्या नदीपात्रात माशांच्या मृत्यूमुळे एकच खळबळ उडाली आहे. कृष्णाकाठी असणाऱ्या अनेक गावांमध्ये सध्या मृत माशांचे खच पडलेले दिसून येत आहे. त्यामुळे कृष्णेच्या पात्रात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कृष्णाकाठी भीतीचे वातावरण पसरले आहे.
कृष्णाकाठी असणाऱ्या काही साखर कारखान्यांचे मळीमिश्रित पाणी नदीपात्रात सोडल्यामुळे हा सर्व प्रकार घडल्याचे बोलले जाते. याआधीही कृष्णा नदीच्या पात्रामध्ये अनेक वेळा माशांचे मृत्यूचे प्रकार घडले आहेत. मात्र या कारखान्यांवर केवळ प्रदूषण महामंडळाकडून जुजबी कारवाई करण्यात आली असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
ऐन पावसाळ्यात नदी प्रवाहित असताना माशांचा मृत्यू धक्कादायक घटना आहे. त्यामुळे प्रदूषण मंडळ नेमकी काय भूमिका घेणार आणि संबंधित कारखान्यावर कारवाई करणार का ? हा प्रश्न निर्माण झाला आहे.