सांगली- जरी महापूर रोज येत नसला तरी, सरकारने किमान पावसाळ्यात आपत्ती यंत्रणा सक्षम ठेवली पाहिजे होती. तसेच सांगलीच्या महापुरा दरम्यान वेळेत बोटी उपलब्ध न होऊ शकल्याने नागरिकांचा जीव गेला व त्यांचे प्रचंड हाल झाले, असा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्या शर्मिला ठाकरे यांनी सरकारवर केला आहे.
शर्मिला ठाकरे यांनी घेतली पूरग्रस्तांची भेट शर्मिला ठाकरे यांनी आज सांगलीतील पूर भागाची पाहणी केली. या दरम्याण त्यांनी पूरग्रस्तांशी संवाद साधला. त्यावेळी शर्मिला यांनी सदरील प्रतिक्रिया दिली. शर्मिला ठाकरे यांनी आज ब्रह्मनाळ याठिकाणी पूरपस्थितीची पाहणी केली व पूरग्रस्तांशी संवाद साधला. जिल्ह्यातील गावभाग यासह विविध परिसरात जाऊन शर्मिला ठाकरे यांनी पुरानंतरच्या स्थितीचा आढावा घेतला.
त्यानंतर बोलताना शर्मिला ठाकरे यांनी सांगितले की, आज आपण दिवसभर जिल्ह्यातील ५ ठिकाणची पूरस्थितीची पाहणी करतो आहे. आज पूर ओसरून तिसरा दिवस झाला आहे. मात्र कचऱ्याचा उठाव, वीज व पाणी यासारख्या सेवा देण्यात शासन अपयशी ठरला आहे. त्यामुळे पूरग्रस्त नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने कचऱ्याचा उठाव आणि पाणी व वीजेची उपलब्धता करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
तसेच जिल्ह्यात महापूर येण्या आधीपासूनच मनसे कार्यकर्त्यांनी या ठिकाणी बोटी उपलब्ध करुण देण्याची जिल्हाधिकाऱ्यांकडे मागणी केली होती. मात्र त्या वेळी बोटी उपलब्ध होऊ शकल्या नाही. परिणामी ब्रह्मनाळ येथील लोकांना जीव गमवावा लागला. त्याचबरोबर बोटी नसल्याने जे नागरिक पुरात अडकले होते, त्यांनाही वेळेत सुविधा मिळू शकल्या नसल्याचा आरोप शर्मिला ठाकरे यांनी केला.