सांगली- शहरातील पुराची पाणी पातळी झपाट्याने ओसरत आहे. 2 दिवसांपूर्वी 58 फुटांवर असलेली कृष्णा नदीची पाणी पातळी आज सकाळी 8 वाजेपर्यंत 51.4 फुटापर्यंत उतरली आहे. त्यामुळे सांगली शहरातील जनजीवन काही भागात पूर्वपदावर येत आहे.
सांगलीतील पाणी पातळी झपाट्याने ओसरू लागली, काही भागात जनजीवन पूर्वपदावर - जनजीवन
मारुती चौक परिसर व सखल भाग वगळता शहरातील कापड पेठ, महापालिका, पोलीस ठाणे,फौजदार गल्ली, एसटी स्टॅन्ड, गावभाग या अनेक परिसरातील पाणी ओसरले आहे.
रविवारी दुपारपासून शहरातील पाणी पातळी उतरायला सुरुवात झाल्यानंतर नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला आहे. पाणी पातळी ओसरण्यास सुरवात होताच काही भागातील व्यवहार सुरू होत आहेत. त्यामुळे गेली काही दिवस शासकीय मदतीवर अवलंबून असणाऱ्या पूरग्रस्त नागरिकांना आता मोकळीक मिळाली आहे.
सकाळपासून सांगलीत स्वच्छता मोहिमा सुरू झाल्या आहेत. यामध्ये महापालिका यंत्रणेबरोबर स्थानिक संस्था संघटना यांनी स्वच्छतेसाठी पुढाकार घेतला आहे. सांगली बस स्थानकातील पाणी ओसरल्यामुळे काही वेळात बससेवासुद्धा सुरू होणार आहे.