सांगली - संततधार पाऊस आणि कोयना धरणातून सोडण्यात येणाऱ्या पाण्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ कायम आहे. त्यामुळे सांगलीमध्ये पूरस्थिती निर्माण होत आहे. सोमवारी (दि. 17 ऑगस्ट) दुपारी तीन वाजता कृष्णा नदीची पाण्याची पातळी 35 फुटांवर पोहोचली. पाणी पातळीमध्ये हळूहळू वाढ कायमच आहे. तर पाण्याची पातळी 35 फुटांवर पोहोचल्याने सांगली शहरातील पूर पट्ट्यात असणारा सांगली-पलूस मार्गावरील कर्नाळ रोडवरील पूल आणि रस्ता पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे बायपास शिवशंभो चौकातून सांगलीकडे येणारा मार्ग बंद करण्यात आली आहे. यामुळे या मार्गावरील वाहतूक बायपास मार्गे वळवण्यात आली आहे.
सांगलीच्या कर्नाळ रस्त्यावर पाणी, वाहतूक बायपासमार्गे वळवली - सांगली-पलूस बातमी
सांगली जिल्ह्यात संतत पाऊस व कोयना धरणातून सोडण्यात आलेला पाण्याच्या विसर्गामुळे कृष्णा नदी पात्रात पाण्याची वाढ झाली आहे. त्यामुळे सांगली-पलूस मार्गावरील कर्नाळ रोडवरील पूल व रस्ता पाण्याखाली गेला आहे.
तर या भागातील सूर्यवंशी प्लॉट, दत्त नगर, काका नगर याठिकाणी घरात सकाळपासूनच पाणी शिरायला सुरुवात झाली होती. जवळपास 20 हून अधिक घरांमध्ये आता पाणी शिरले आहे. या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांचे पालिका प्रशासनाच्या वतीने स्थलांतर करण्यात येत आहे.
महानगरपालिका आयुक्त नितीन कापडणीस सकाळपासून या पूर पट्ट्यातील भागात जाऊन नागरिकांना स्थलांतरित होण्याच्या सूचना देत आहेत. त्याचबरोबर पाण्याच्या पातळीतही आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क रहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.