सांगली- कोरोनाग्रस्तांची संख्या वाढल्याने शासकीय रुग्णालय अपुरे पडत आहेत. खासगी रुग्णालयात गरीब रुग्णांना उपचार करणे परवडत नाही. त्यामुळे राज्य शासनाने आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर गोरगरीब जनतेला सर्व रुग्णालयात मोफत उपचार द्यावेत, अशी मागणी जनता दल सेक्युलर महाराष्ट्र पक्षाचे प्रदेशाध्यक्ष व माजी आमदार शरद पाटील यांनी केली आहे.
राज्यात कोरोनाची गंभीर स्थिती
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये संसर्ग व रुग्णसंख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. त्यामुळे राज्यातील सर्व बेडस्, ऑक्सिजन बेडस् व व्हेंटीलेटर बेडस् ही संख्या अपुरी पडू लागली आहेत. शासकीय रुग्णालयात सेवा मोफत आहेत. पण, प्रत्यक्षात शासकीय रुग्णालयात जागा नाही. त्यामुळे अनेक गरीब कोरोनाग्रस्त रुग्णांना खासगी रुग्णालयात भरती व्हावे लागत आहे. तेथील लाखो रुपयांचे बिल परवडत नाही, अशा गरीब रुग्णांचे प्रचंड हाल होत आहेत. ऑक्सिजन व व्हेंटीलेटर अभावी अनेक मृत्यू होत आहेत. वास्तविक कोरोना महामारी ही जागतिक असाधारण आपत्ती आहे.अशावेळी सर्व रुग्णांना मोफत वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे ही संपूर्णपणे केंद्र सरकार व राज्य सरकारची जबाबदारी आहे.