सांगली- शहरात फेब्रुवारीपर्यंत असणारी थंडीची लाट ओसरली आहे आणि आता हळूहळू उन्हाची तीव्रता वाढू लागली आहे. या वाढत्या उष्म्यामुळे नागरिकांचा शीतपेयाकडे ओढा वाढत आहे. तर उन्हाळ्यात मुबलक प्रमाणात असणाऱ्या कलिंगडची आवक यंदा कमी असल्याने दर वाढले आहेत. त्यामुळे मनमुराद अस्वाद घेताना ग्राहकांच्या खिशाला कात्री बसत आहे.
उन्हाचे चटके, शीतपेयांकडे ओढा -सांगली शहरासह जिल्ह्यात उन्हाची तीव्रता वाढत आहे. फेब्रुवारीपर्यंत कडाक्याची थंडी सांगलीकरांना अनुभवायला मिळत होती. मात्र, मार्च महिना सुरू झाल्यानंतर थंडीचा जोर ओसरला आहे. उन्हाचे चटके हळू हळू वाढू लागले आहेत. अंगाची लाही लाही होत असल्याने शहरातीला रस्त्यांवर दुपारनंतर फारशी गर्दी पाहायला मिळत नाही. उन्हाचा पारा जसजसा वाढत आहे, तसतसे नागरिकांचा शीतपेयांकडे ओढा वाढताना पाहायला मिळत आहे. शहरातील नारळ विक्रेते, रसवंती गृह, आइस्क्रीम विक्रेत्यांच्या दुकानासमोर गर्दी पाहायला मिळत आहे. दुसऱ्या बाजूला उन्हाळ्यात सर्वसामान्यांना गोडवा आणि थंडपणा देणारा कलिंगड मात्र महागला चित्र पाहायला मिळत आहे.