सांगली - येथील दुष्काळी जत तालुक्यातील पाण्यापासून वंचित असणाऱ्या ४६ गावांनी दुष्काळग्रस्तांनी मंत्रालयावर धडक देण्यासाठी पायी दिंडी काढली आहे. कालपासून या पायी दिंडीला सुरूवात झाली. पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली काढल्याशिवाय माघार घेणार नाही, असे सांगत थेट सरकारच्या दारात जाण्याची भूमिका या दुष्काळग्रस्तांनी घेतली आहे.
सांगली जिल्ह्यातील पूर्व भाग असणाऱ्या दुष्काळी जत तालुक्यात यंदा पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली आहे. सध्या जवळपास शंभर टँकर तालुक्यात पाणी पुरवठा करत आहेत. तर म्हैसाळ सिंचन योजनेतून तालुक्यात थोड्या प्रमाणात पाणी पोहोचले आहे. मात्र, पूर्व भागातील ४६ गावे आजही पाण्यापासून वंचित आहेत. या ठिकाणी कोणतीही योजना पोहोचू शकली नाही. शेजारच्या कर्नाटक राज्यातून पाणी देण्याबाबत निर्णय घेण्यात आला होता मात्र, तो सत्यात उतरू शकला नाही. लोकसभा निवडणुकीच्या आधी खासदार संजयकाका पाटील यांनी वंचित गावांचा पाणीप्रश्न सोडविण्यासाठी म्हैसाळ विस्तार योजना तयार केली होती. याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा मंजुरी दिली. पण, प्रत्यक्षात पाणी कधी मिळणार याबाबत दुष्काळग्रस्तांमध्ये साशंकता आहे.