जत (सांगली) - तालुक्यातील शिक्षकाने गावातीलच एका पंधरा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. सतीश अंकुश कांबळे असे संशयित आरोपी शिक्षकाचे नाव असून शनिवारी दुपारच्या वेळस ही घटना उघडकीस आली. या घटनेनंतर आरोपी कांबळे हा फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. याबाबत उमदी पोलीस ठाण्यात पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तक्रार दिली.
घटना घडल्यानंतर सतिश कांबळे हा राजकीय लोकांशीही संबंधित असल्याने त्याला वाचविण्यासाठी काहींचे जोरदार प्रयत्न सुरू होते. परंतु, पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून आरोपी व राजकीय पदाधिकारी यांचा डाव हाणून पाडला. त्यामुळे पोलिसांनी या घटनेच्या मुळाशी जाऊन चौकशी करण्याची मागणी होत आहे.
संशयित आरोपी सतीश कांबळे हा तालुक्यातील पहिली ते चौथीच्या एका खासगी प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत आहे. सध्या संचारबंदी लागू असल्याने सर्वच शाळांना सुट्या आहेत. या दरम्यान गुरूवारी (दि. 9) अल्पवयीन मुलीला दमदाटी करून आपल्या स्वतःच्या घरात त्याने पहिल्यांदा तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर शनिवारी दुपारी संचारबंदी असल्याने गावात कमालीची शांतता होती. त्यामुळे संशयित आरोपी कांबळे याचा फायदा घेत पीडित मुलीस पुन्हा दमदाटी केली आणि सनमडी गावातील जिल्हा परिषद शाळेत घेऊन गेला. तिथे तिच्यावर बळजबरी करत असताना मुलीने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. जवळच मुलीचे घर असल्याने घरात बसलेला मुलीचा भाऊ घराबाहेर धावत आला. तेवढ्यात कांबळे हा भाऊ व परिसरातील नागरिक गोळा होऊ लागल्याने तेथून पसार झाला.
या घटनेनंतर पीडित मुलीसह नातेवाईकांनी उमदी पोलीस ठाणे गाठत संबंधित आरोपी विरोधात तक्रार दिली असून पोलिसांनी बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. परंतु, तो अद्याप फरार असल्याचे पोलिसांनी सांगितले.