सांगली- स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पलूसच्या अंकलखोप येथे ऊस वाहतूक करणारे ४० वाहने रोखली होती. यावेळी ऊस वाहतूकदार आणि स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये वादावादीचा प्रकार घडला. अखेर स्वाभिमानीच्या आक्रमक भूमिकेनंतर ऊस वाहतूकदार संघटनेने दराचा प्रश्न सुटल्याशिवाय ऊस वाहतूक करणार नसल्याचे स्पष्ट केले.
ऊस दरावरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्ह्यात आंदोलन छेडले आहे. रस्त्यावर उतरून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून ऊस वाहतूक बंद पाडण्यात येत आहे. तर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर साखर कारखानदारांकडून रात्रीच्या सुमारास ऊस वाहतूक करण्यात येत आहे. त्यामुळे मंगळवारी रात्री स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी विटा नजीकच्या उदगीरी साखर कारखाण्यासाठी सुरू असलेली ऊस वाहतूक रोखली. पलूस तालुक्यातील अंकलखोप येथे ऊसाने भरलेले सुमारे ४० ट्रॅकटर रोखून धरण्यात आले व घोषणा देत ऊस वाहतूक बंद पाडण्यात आली.