सांगली - स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या दूध दरवाढीच्या आंदोलनामुुळे जिल्ह्यातील दूध संकलनावर मोठा परिणाम झाला आहे. जिल्ह्यात सुमारे १३ ते १४ लाख लिटर दूध संकलन ठप्प झाले. त्यामुळे जिल्ह्यात दूध विक्रीवर परिणाम होण्याच्या शक्यता आहे.
दूध दरवाढीच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज राज्यभर दूध बंद आंदोलन पुकारले आहे. जिल्ह्यातही या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जवळपास सर्वच दूध डेअरी व दूध संघाचे संकलन बंद आहे. सोमवारी सायंकाळपासूनच जिल्ह्यातल्या अनेक दूध संघ व दूध डेअरीने संकलन बंद केले होते.
आज सकाळपासून जिल्ह्यातील दूध संकलन ठप्प आहे. वाहतूक करणाऱ्या दूध टँकरवर शेतकरी संघटनेकडून हल्लाबोल करत दूध ओतून देण्यात आले आहे. तर हजारो लिटर दूध रस्त्यावर वाहून गेले आहे.
जिल्ह्यामध्ये राजारामबापू दूध संघ, वसंतदादा पाटील दूध संघ, हुतात्मा दूध संघ, सोसायट्या यांसह चितळे दूध डेअरी, राम विश्वास दूध यासह अनेक सहकारी व खासगी दूध डेअरीच्या माध्यमातून दुधाचे संकलन केले जाते. जिल्ह्यात दररोज सकाळी आणि सायंकाळी दूध संकलन होत असते. त्यामधून रोज किमान १३ ते १४ लाख लिटर दूध संकलन होते. त्यामधील दूध मोठ्या प्रमाणात मुंबई व पुणे या ठिकाणी वितरणासाठी जाते.मात्र, स्वाभिमानीच्या
आंदोलनामुळे दूध वितरण प्राणीलावर परिणाम झाला आहे.
मुंबई व पुणे शहराकडे जाणारे दूध टॅंकर जागेवरच थांबले आहेत.जिल्ह्यातून जवळपास ९ ते १० लाख लिटर दूध हे मुंबई व पुणे येथे वितरित केले जाते.