महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

वीजबिल, एफआरपी आणि अंबानींच्या मुद्द्यावरुन राजू शेट्टी आक्रमक; सरकारसह विरोधी पक्षाला धरले धारेवर - राजू शेट्टी वीज बिल आंदोलन

"कोरोना गेला खड्ड्यात, आधी आमच्या एफआरपीचे पैसे द्या", असा गर्भित इशारा स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना दिला आहे. यावेळी बोलताना भ्रष्टाचार आणि दालन सजवायला पैसा आहे, मग वीज बील माफ करायला का नाही? असा संतप्त सवाल करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते...

Swabhimani leader Raju Shetty takes a bash at Maharashtra Government and opposition over light bill and Ambani
'कोरोना गेला खड्ड्यात; आधी एफआरपी द्या'; राजू शेट्टींनी साधला सरकारसह विरोधी पक्षावर निशाणा

By

Published : Mar 16, 2021, 5:01 AM IST

सांगली : "कोरोना गेला खड्ड्यात, आधी आमच्या एफआरपीचे पैसे द्या", असा गर्भित इशारा स्वाभिमानीचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी साखर कारखानदारांना दिला आहे. यावेळी बोलताना भ्रष्टाचार आणि दालन सजवायला पैसा आहे, मग वीज बील माफ करायला का नाही? असा संतप्त सवाल करत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला. ते सांगलीमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

वीजबिल, एफआरपी आणि अंबानींच्या मुद्द्यावरुन राजू शेट्टी आक्रमक; सरकारसह विरोधी पक्षाला धरले धारेवर

कोरोना गेला खड्ड्यात..

ऊसाचा एफआरपी, वीज बिल माफी आणि अंबानी यांच्या घरासमोर सापडलेल्या गाडीच्या मुद्द्यावरुन स्वाभिमानीचे खासदार राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी सरकारसह विरोधी पक्षावर जोरदार निशाणा साधला आहे. उसाच्या एफआरपीवरून बोलताना शेट्टी म्हणाले, "आता पर्यंत इशारा दिला म्हणून कोल्हापूर जिल्ह्यात एफआरपी मिळाला. पण आता राज्यात कोरोनामुळे आंदोलन करायला मर्यादा पडतात, आणि त्याचा हे फायदा उठवत आहेत. पण आता कोरोना गेला खड्ड्यात, आधी आमचा एफआरपी द्या, अशी भूमिका आम्हाला घ्यावी लागेल" असा इशारा शेट्टी यांनी दिला.

सत्ताधारी आणि विरोधकांना काही वाटत नाही..

तर वीजबिल माफीच्या मुद्द्यावरून बोलताना शेट्टी म्हणाले, "मुळात सर्वसामान्य जनतेचे प्रश्न ज्वलंत असताना त्यावर चर्चा करावी, असे सत्ताधारी आणि विरोधी पक्षालाही वाटत नाही असं मला वाटायला लागले आहे. आज विजेची बिलं भरायला लोकांच्याकडे पैसे नाहीत. वर्षभर वितरण कंपनी झोपा काढत राहिली, लोकांना वर्षभर वीज बिलं दिली नाहीत. मधे ऊर्जामंत्री यांनी लोकांच्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे वीज बिल वसुली करणार नाही, असं सांगितलं. मात्र आता अचानक वर्षभराच्या वीज बिलांची मार्च महिन्यामध्ये वसुली चालू केली आहे. लोकांचे काम-धंदे गेले, नोकऱ्या गेल्या, व्यवसाय बंद पडले. शेतकऱ्यांना आपला शेतीमाल टाकावा लागला, आणि आता वीज वितरण कंपन्यांनी वीज बिल वसूलीसाठी वीज तोडण्याचा सपाटा लावलेला आहे. वास्तविक पाहता वीज तोडण्यापूर्वी 15 दिवसांची नोटिस द्यायला हवी, मात्र इथे कायदेशीर काहीचं चाललं नाही."

राज्यात चाललंय काय?

विधानसभेत वीज बिलाबाबत विरोधी पक्षाने आवाज उठवल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी वीज वसुली आणि तोडणीला स्थगिती दिली. पुढील चर्चेनंतर बिल वसूल करू असं सांगितले. मात्र पुढची चर्चा ही झाली नाही, पुढचा निर्णयही झाला नाही. मग चर्चा न होता ती स्थगिती का उठवली, काय चाललंय या राज्यामध्ये? असा संतप्त सवाल शेट्टी यांनी उपस्थित केला.

वीज ग्राहक पहिल्यांदा मागणी करतोय..

घरगुती वीज ग्राहक पहिल्यांदा सरकारकडे काही तर मागत आहे, यापूर्वी घरगुती वीज ग्राहकांना सरकारने कधीही वीजबिल माफ केलं नाही. आज राज्यातला 100 युनिटपर्यंत वीज वापरणारा घरगुती वीज ग्राहक आहे. त्यांची संख्या 1 कोटी 25 लाखांच्या घरात आहे. कोरोना काळातली फक्त तीन महिन्यांची वीजबिलं माफ करा, अशी मागणी हे लोक करत आहेत. कारण त्या काळात रस्त्यावर पोलीस दंडुका घेऊन बसले होते, रस्त्यावर सुद्धा येऊन देत नव्हते. लोकांचा रोजगार बुडाला, धंदा बुडाला, नोकऱ्या गेल्या, शेतीकडे लक्ष देण्यात आले नाही त्यामुळे लोक वीजबिल देऊ शकले नाहीत, असे शेट्टी म्हणाले.

भ्रष्टाचारात मुरवायला पैसे मग वीज बिल का नाही?

तीन महिन्यांचे 300 युनिट वीज बिल माफ करण्यासाठी फक्त तीन हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे. 1 कोटी 25 लाख कुटुंबांना त्यामुळे दिलासा मिळणार आहे. महाराष्ट्राच्या जनतेला दिलासा मिळणार आहे. मात्र, आमच्याकडे तेवढे पैसे नाहीत असे म्हणतात. मग मंत्र्यांची दालनं सजवायला पैसा कुठला आला? कोरोनामध्ये भ्रष्टाचार केला, विकासकामांना कात्री लावली आणि त्यातून सगळा पैसे कोरोनासाठी वापरला. म्हणून पाच रुपयांचा मास्क पन्नास रुपयाला खरेदी केला, व्हेंटिलेटर खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला, औषध खरेदीमध्ये भ्रष्टाचार झाला. हा पैसा मुरवायाला तुमच्याकडे पैसे आहेत, मग महाराष्ट्रातील जनतेला वीज बिल माफ करायला तुमच्याकडे पैसे नाहीत का? असे शेट्टी म्हणाले.

देशातील चार राज्यांमध्ये वीज दरात सवलत दिली गेली आहे, मग महाराष्ट्र का देत नाही ? एवढा साधा प्रश्न आहे. त्यामुळे आज आम्हाला रस्त्यावर उतरावे लागत असल्याचे शेट्टी यांनी स्पष्ट केले.

महाराष्ट्रात फक्त अंबानी राहतात का?

तर सध्याच्या अंबानी, मनसुख हिरेन आणि वझे प्रकरणावरून बोलताना ते म्हणाले, की "मला फक्त एकच प्रश्न सगळ्याच राजकीय पक्षांना विचारायचा आहे, महाराष्ट्रात फक्त मुकेश अंबानी राहतात का? बाकी 14 कोटी कोण राहतं की नाही? मुकेश अंबानींच्या घरासमोर जिलेटीन सापडलं, ते उडणार नव्हतं कारण त्याला दुसरे सॉकेट नव्हतं. त्यामुळे हा नुसता बनाव आहे. मुकेश अंबानीची प्रसिद्धी व्हावी, त्यांना सहानुभूती मिळावी म्हणून ठेवलेला आहे का? अजून काय भानगड आहे? त्याच्यासाठी अधिवेशन वाया गेलं. त्यासाठी गृहमंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते भांडण करतात, त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न दिसत नाहीत का? त्यांना केवळ दिसतात मुकेश अंबानी आणि सत्ताधारी पक्ष सुद्धा त्याच्या मागे फरफटत चालला आहे, असा आरोपही शेट्टी यांनी केला.

हेही वाचा :ईडीचा दणका; काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या जावयाची संपत्ती जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details