सांगली- जिल्ह्यातील दुष्काळी तालुक्यांना शासनाने तातडीने सुविधा द्याव्यात, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते विशाल पाटील यांनी केली आहे. या बाबतच्या मागण्यांचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
सांगली जिल्ह्यात सध्या दुष्काळीची दाहकता वाढत आहे. मे महिना सुरू झाला असून या महिन्यात दुष्काळी भागात नागरिकांना पाणी टंचाईसह अनेक समस्यांना मोठ्या प्रमाणात तोंड द्यावे लागणार आहे. शासनाने दुष्काळी सवलत जाहीर केली आहे. मात्र ती दुष्काळग्रस्त जनतेपर्यंत पोहोचत नसल्याचा आरोप स्वाभिमानीचे नेते आणि सांगली लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार विशाल पाटील यांनी केला. तसेच दुष्काळी तालुक्याना शासनाने जाहीर केलेल्या सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही दुष्काळी भागातील शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची भेट घेऊन केली. यावेळी विशाल पाटील यांनी दुष्काळी भागातील जनतेच्या समस्यांवर जिल्हाधिकाऱ्याशी तासभर चर्चा केली.