सांगली Sangli Accused Absconded : जिल्हा कारागृहासमोरून एका संशयित आरोपीनं पलायन केल्याचा प्रकार घडला आहे. लक्ष्मण चौगुले, असं 'या' संशयित आरोपीचं नाव आहे. एका गुन्ह्यामध्ये लक्ष्मण चौगुले हा सांगली कारागृहामध्ये अटकेत होता. मात्र, वैद्यकीय तपासणी करून तुरुंगात येत असताना त्यानं थेट तुरुंगासमोरच पोलिसांच्या हाताला झटका मारून चौगुले फरार झाला आहे.
लक्ष्मण चौगुलेचं पलायन : शनिवारी रात्रीच्या सुमारास सांगली जिल्हा कारागृहासमोरून लक्ष्मण चौगुले या संशयित आरोपीनं धूम ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे. विटा पोलिसांच्याकडून एका गुन्ह्यामध्ये संशयित चौगुलेला अटक करण्यात आली होती. सध्या 'तो' सांगलीच्या जिल्हा कारागृहामध्ये होता. शनिवारी त्याला वैद्यकीय तपासणी करण्यासाठी कारागृहामधून बाहेर काढण्यात आलं होतं. त्यानंतर चौगुले याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली होती. वैद्यकीय तपासणी झाल्यानंतर चौगुले याला पुन्हा पोलीस बंदोबस्तात तुरुंगात नेण्यात येत होते.
अशी घडली घटना : काल रात्री दहा ते अकराच्या सुमारास चौगुलेला घेऊन पोलीस कारागृहासमोर पोहोचले. तेव्हा, त्यानं गाडीतून उतरून कारागृहाकडं जात असताना पोलिसांच्या हाताला झटका मारून हातातल्या बेडयांसह तिथून पलायन केलं. यावेळी पोलिसांनी चौगुलेचा पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. मात्र, अंधाराचा फायदा घेत, चौगुले पसार झाला आहे.
आरोपीच्या शोधासाठी दोन विशेष पथकं : या घटनेनंतर सांगली शहर पोलीस ठाण्यामध्ये याबाबत नोंद झाली असून सांगली पोलिसांच्याकडून चौगुलेच्या शोध घेण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. रात्रभर जिल्ह्यात ठिकठिकाणी पोलिसांनी नाकेबंदी केली होती. मात्र, चौगुले कुठेच सापडला नाहीय. त्यानंतर त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन विशेष पथके देखील रवाना झाली आहेत, अशी माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सतिश शिंदे यांनी दिली आहे.
हेही वाचा -
- 31 जानेवारीला कोस्टल रोड होणार सुरू- मुख्यमंत्र्यांची घोषणा
- मुंबईत नऊ कोटी रुपयांचं कोकेन जप्त, नायजेरियाच्या दोघांना अटक
- महायुतीतील घटक पक्षात नाराजी; कोणाची मनं झाली 'कडू', कोणी म्हणते कुरबूर नाही