महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Sep 2, 2020, 5:20 PM IST

ETV Bharat / state

लॉकडाऊनमध्ये बनवली 'पायरेट्स ऑफ कॅरेबियन' या हॉलिवूडपटातील 'ब्लॅक पर्ल' या जहाजाची प्रतिकृती

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर केले. त्यानंतर सर्व जनता घरात बसून होती. या काळात प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने आपला वेळ घालवला. सांगलीतील एका विद्यार्थ्यांने 'पायरेट्स ऑफ कॅरेबियन' या हॉलीवूडपटातील 'ब्लॅक पर्ल' या जहाजाची प्रतीकृती साकारली आहे. सुमित इरळे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

Sumit Earle
सुमित इरळे

सांगली -कोरोनामुळे लावण्यात आलेल्या लॉकडाऊन काळात सर्व शाळा-महाविद्यालये बंद आहेत. या काळात वेळेचा सदुपयोग करत सांगलीतील एका विद्यार्थ्यांने 'पायरेट्स ऑफ कॅरेबियन' या हॉलीवूडपटातील 'ब्लॅक पर्ल' या जहाजाची प्रतीकृती साकारली आहे. सुमित इरळे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने मार्च महिन्यापासून लॉकडाऊन जाहीर केले. त्यानंतर सर्व जनता घरात बसून होती. या काळात प्रत्येकाने वेगवेगळ्या पद्धतीने आपला वेळ घालवला. सुमितने लॉकडाऊनचा वेळ आपली कलाकृती जगासमोर आणण्यात घालवला. कार्डबोर्डच्या सहाय्याने सुमितीने ही जहाजाची प्रतिकृती तयार केली.

सुमित इरळे या विद्यार्थ्याने 'पायरेट्स ऑफ कॅरेबियन' या हॉलीवूडपटातील 'ब्लॅक पर्ल' या जहाजाची प्रतिकृती तयार केली

सुमित हा सांगली शहरातील विश्रामबाग परिसरात आपल्या आई-वडिलांसोबत राहतो. त्याच्या कुटुंबाची सांगलीत पॅकेजिंग कंपनी आहे. लॉकडाऊनचा सुरुवातीचा काळ सुमितने चित्रपट बघण्यात घालवला. 'पायरेट्स ऑफ कॅरेबियन' हा चित्रपट पाहत असताना त्यामधील कॅप्टन जॅक्स स्पॅरोची 'ब्लॅक पर्ल' हे जहाज सुमितला भावले. त्याने तसेच जहाज बनवण्याचा निश्चिय केला. आपल्या वडिलांच्या इंडस्ट्रीमधील काही वेस्ट आणि काही चांगले कार्ड बोर्ड आणून सुमितने त्यापासून जहाज बनवायला सुरूवात केली. चार महिन्यांच्या अथक प्रयत्नानंतर सुमितची ही कलाकृती तयार झाली. या जहाजावर त्याने 20 छोटे रंगीबेरंगी लाईटही बसवले आहेत.

सुरुवातीला जहाज बनवताना खूप अडचणी आल्या, कारण कार्डबोर्डपासून जहाज बनवणे सोपे नाही. कार्डबोर्ड चिकटवण्यासाठी त्याला खूप परिश्रम घ्यावे लागले. जहाजामधील छोट्या-छोट्या बोटी बनवणे, लायटिंग करणे या गोष्टी आव्हानात्मक होत्या. मात्र, आपण हे करू शकतो असा मनाशी निश्चय केला होता. त्यामुळे मी हाती घेतलेले काम पूर्ण केलेच, असे सुमितने सांगितले.

सुमितचे वडील सुरेश इरळे यांनी या कलाकृतीबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे. गेल्या चार महिन्यापासून तो जहाज बनवत आहे याची कल्पना आपल्याला नव्हती. तो रोज इंडस्ट्रीमध्ये यायचा व वेस्ट मटेरियल आणि त्याला लागणाऱ्या काही वस्तू घेऊन जायचा. घरातही तो त्याच्या रूममध्ये आम्हाला कोणालाही येऊ देत नव्हता. तो काहीतरी चांगले करत आहे, एवढेच माहित होते. ज्यावेळी जहाज पूर्ण झाले, त्यावेळी त्याने मला माझे डोळे बंद करून रूममध्ये नेत, जहाज दाखवले. जहाज बघून मला आश्चर्याचा धक्का बसला. सुमितला मेकॅनिकल इंजिनिअर बनायचे आहे. सांगलीतील एका इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये त्याचा प्रवेशही झाला आहे. त्याने बनवलेले जहाज पाहता तो एक उत्तम इंजिनियर बनेल याची पक्की खात्री असल्याची प्रतिक्रिया सुमितचे वडील सुरेश इरळे यांनी दिली.

सुमितची लॉकडाऊनमधली ही कलाकृती पाहून त्याच्या संपूर्ण कुटुंबाने सुमितचे कौतुक केले आहे. आता सुमित इंजिनिअरिंगचे शिक्षण घेणार आहे. त्याने आपल्यातील कल्पकतेची चुणूक हे जहाज बनवून दाखवली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details