सांगली- पलूस या ठिकाणी रस्त्याच्या वादातून तरुणाने अंगावर रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. स्वतःच्या घरावर चढून तरुणाने केलेल्या आत्महत्येच्या प्रयत्नामुळे यावेळी प्रशासनाची मात्र तारांबळ उडाली होती. अखेर पोलिसांनी शिताफीने तरुणाला ताब्यात घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न हाणून पाडला. अक्षय लाड असे त्या आत्मदहनाचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
रस्त्याच्या वादातून तरुणाचा रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न - सांगली पलूस शेतरस्ता
पलूस येथील पलूस कॉलनी ते कुंडल रस्त्याचे काम बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे. दरम्यान हा रस्ता वहिवाटी प्रमाणे करण्यासाठी प्रशासनाचा प्रयत्न होता. तर नकाशाप्रमाणे रस्ता करा, अशी मागणी येथील काही शेतकऱ्यांची आहे. या रस्त्यावरून शेतकरी आणि प्रशासन असा गेल्या वर्षभरपासून वाद सुरू आहे.
तरुणाचा रॉकेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न
या वादातून अक्षय लाड या तरुणाने स्वतःच्या घरावर चढून अंगावर रॉकेल ओतून घेत आत्मदहन करण्याचा प्रयत्न सुरू केला. प्रशासनासमोरच हा सर्व प्रकार घडल्याने तहसीलदार यांच्यासह पोलीस प्रशासनाची यावेळी चांगलीचं तारांबळ उडाली. अखेर पलूस पोलिसांनी प्रसंगावधान राखत घराच्या छतावर चढून तरुणाला आत्मदहनापासून रोखले. या घटनेमुळे काही वेळ या परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाले होते, त्यानंतर घटनास्थळी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
Last Updated : Mar 24, 2021, 8:51 AM IST