सांगली:सांगलीच्या पलूस तालुक्यातल्या औदुंबर येथील शेतकरी सुहास पाटील यांनी शेतीला जोडधंदा म्हणून, गुऱ्हाळघर निर्माण करून आपली आर्थिक प्रगती साधली आहे. केवळ तीन माणसांच्या माध्यमातून पाटील यांचे गुऱ्हाळ घर चालते. ज्यामुळे सुहास पाटलांना आता तिप्पट उत्पन्न मिळत आहे. सेंद्रिय ऊस त्यातून सेंद्रिय गूळ आणि गुळाचे पदार्थ बनवून स्वतःच्या गूळ प्रॉडक्टचे ब्रॅण्डिंग देखील पाटील यांनी केले आहे. सुहास पाटील यांची वडिलोपार्जित 12 एकर शेती आहे. ज्यामध्ये ते ऊसाचे आणि हळद पिकाचे उत्पादन घेतात. साडेतीन एकर क्षेत्रावर पाटील ऊसाची शेती करत त्यामधून त्यांना फारसे उत्पन्न मिळत नव्हते. ऊसाची कमी एफआरपी आणि तेही तीन टप्प्यात मिळणारे पैसे, यामुळे पाटील यांनी सुरूवातीला छंद म्हणून फोटोग्राफी हा व्यवसाय सुरू केला, हे करत असताना त्यांनी सेंद्रिय पद्धतीने शेती करायचे ठरवले.
उसावर प्रक्रिया करून गूळ तयार: सुहास पाटील यांनी सेंद्रिय ऊसाची शेती केली. त्यानंतर कारखान्याला ऊस पाठवण्याऐवजी गुऱ्हाळघरातून गूळ तयार करून विक्री करण्याचा व्यावसाय चालू केला होता. मात्र यामध्ये मोठ्या प्रमाणात नुकसानाला सामोरे जावे लागले. कधी गुळाला दर मिळत नाही, तर कधी गूळ शिल्लक राहून खराब होऊन जायचा. ऊस पिकवला की, तो साखर कारखान्यामध्ये द्यावा लागतो. पण त्या तुलनेने पैसे कमीच मिळतात. तर गूळ करायचा झाला तर दुसऱ्याच्या गुऱ्हाळघरामधून गूळ तयार केला, तर ज्यादाचा फायदा मिळत नाही. सुहास पाटलांनी स्वतःच्याच उसावर प्रक्रिया करून गूळ तयार करण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू केले. पण गुऱ्हाळघर उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात लाखोंचं भांडवल आणि मनुष्यबळ लागते. एका गुऱ्हाळ घरामध्ये किमान 20 ते 25 माणसे कामासाठी लागतात. मग ऊस तोडणीपासून उसाचा रस करणे, पुन्हा वेगवेगळ्या माध्यमातून त्यावर प्रक्रिया करणे, अशा सर्व कामांसाठी अधिकचे मनुष्यबळ लागते.
गुळाचे विविध पदार्थ: सुहास पाटील यांनी नॅनो पध्दतीने 3 माणसांच्या जीवावर चालणारे गुऱ्हाळघर निर्माण केले आहे. ज्यामुळे त्यांचे वार्षिक उत्पन्न आणि नफा वाढला आहे. सुहास पाटील हे आता दररोज सव्वा टन ऊस गाळप करतात. एक टन उसापासून सुमारे 120 किलो गूळ तयार होतो. ज्याला सरासरी 100 रुपये प्रति किलो दर आहे. ज्यामध्ये छोटी गुळाची ढेप, गूळ पावडर, काकवी, गूळ कॅण्डी बनवतात. केवळ ही बाय प्रॉडक्ट बनवणे इथपर्यंतच न थांबतात पाटील यांनी स्वतःच या मालाची विक्री सुरू केली. गोपालनंदन या ब्रँडच्या नावाखाली सुहास पाटलांचे वेगवेगळे गुळाचे पदार्थ बाजारात विकले जातात. शिवाय त्यांनी आपल्या गुऱ्हाळ घराच्या बाहेरच रस्त्याच्या कडेला दुकान देखील सुरू केला आहे. गुळ खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकाला गुऱ्हाळघरामध्ये गूळ कसा बनवला जातो, ते देखील दाखवले जाते.