सांगली- पश्चिम महाराष्ट्रात ऊसाच्या उत्पादनात सांगली जिल्हा अग्रेसर मानला जातो. नवनवीन प्रयोग करून येथील शेतकरी शंभर टनांच्या पुढे उसाचे उत्पादन घेतात. वाळवा तालुक्याच्या येडेनिपाणी येथील अमर पाटील या शेतकऱ्याने एकरी 130 टनाचे उत्पादन घेतले आहे.
शेतकरी शेतीत नवनवीन प्रयोग करत असतो, जसजसे उत्पादन वाढत जाईल, तसे अधिकाधिक नावीन्यपूर्ण प्रयोग करून आणखी उत्पादनात वाढ, कशी करता येईल, यासाठी शेतकरी झटत असतो. येडेनिपाणी येथील अमर पाटील हे ऊस उत्पादक शेतकरी देखील या पैकीच एक आहेत. अमर पाटील तसे ऊस शेतीत तरबेज आहेत. आत्तापर्यंत ते एकरी 40 टनांपर्यंत असलेले उत्पादन 130 टनांपर्यंत पोचवण्यात यशस्वी झाले आहे. आता एकरी 151 टन उत्पादनाचे ध्येय ठेऊन त्यांचे व्यवस्थापन सुरू केले आहे.
विविध गोष्टींचे काटेकोर नियोजन..
येडेनिपाणी गावातील अमर तात्यासाहेब पाटील हे पट्टीचे ऊस उत्पादक शेतकरी. त्यांचे वडील व दोन चुलते यांची एकत्रित जवळपास 38 एकर शेती आहे. जमिनीचे क्षेत्र जास्त असले तरी उत्पन्न कमी होते. काही जमिनी पडीक होत्या. अमर यांनी बारावीपर्यंत आपले शिक्षण पूर्ण केल्यानंतर शेतीची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. पडीक जमिनींची उत्तम मशागत करून लागवडी योग्य बनवल्या, एकत्र कुटुंबातील तीन विहिरींची खोदाई केली. पाणीस्त्रोत वाढवले पाईपलाइन, संपूर्ण क्षेत्रात ठिबक ही कामे टप्या-टप्प्याने पूर्ण करून ऊसशेती सुरू झाली.
आता 151 टन उत्पादनाचे ध्येय..
पूर्वीच्या काळात या जमिनीत एकरी 30 ते 40 टनच ऊस पिकायचा अमर परिसरातील कै. राजारामबापू सहकारी ऊस कारखान्याच्या संपर्कात आले. त्यातून शास्त्रीयदृष्टया व्यवस्थापन करण्याचा दृष्टिकोन मिळाला. मग प्रयोगांची गोडी वाढली, व्यवस्थापनात बदल करीत, तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेत एकरी 60 ते 65 टन व पुढे 90 ते 95 टन उत्पादनापर्यंत मजल मारली. अलीकडील काही वर्षांत एकरी 120 टन उत्पादनाचा टप्पा ओलांडण्यात ते यशस्वी झाले.