महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Sangli Grapes Farming : बारमाही द्राक्ष उत्पादन घेण्याची किमिया, सांगलीच्या पोपट कोरे शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग - Farmer Parrot Kore from Sangli

औषधी गुणधर्म आणि विषमुक्त असणारी द्राक्ष शेती पोपट कोरे या शेतकऱ्यांने केली आहे. वर्षातून दोन वेळा आतापर्यंत द्राक्षांचे उत्तम पीक कोरे यांनी घेतले आहे. प्रयोग करून केलेली द्राक्ष शेती अत्यंत फायदेशीर आणि उपयुक्त,अशी होऊ शकते, हे कोरे यांनी दाखवून दिले आहे.

Sangli
सांगली

By

Published : Dec 31, 2021, 4:12 PM IST

सांगली - बारमाही द्राक्ष उत्पादन घेण्याची किमिया सांगलीच्या मनेराजुरी येथील एका प्रगतिशील शेतकऱ्याने ( Grapes Farming in Sangli ) साध्य करून दाखवली आहे. औषधी गुणधर्म आणि विषमुक्त असणारी द्राक्ष शेती पोपट कोरे ( Farmer Parrot Kore from Sangli ) या शेतकऱ्यांने केली आहे. वर्षातून दोन वेळा आतापर्यंत द्राक्षांचे उत्तम पीक कोरे यांनी घेतले आहे. विशेष म्हणजे, अवकाळी पावसाचा कोणताही परिणाम कोरे यांच्या द्राक्ष बागेवर झालेला नाही. त्यामुळे प्रयोग करून केलेली द्राक्ष शेती अत्यंत फायदेशीर आणि उपयुक्त,अशी होऊ शकते, हे कोरे यांनी दाखवून दिले आहे.

सांगलीच्या पोपट कोरे शेतकऱ्याचा यशस्वी प्रयोग
द्राक्ष एक गुण अनेक...!देशात द्राक्ष हंगाम हा एकदाच घेतला जातो. त्यामुळे ठराविक काळात द्राक्ष खायला मिळतात. मात्र, सांगलीच्या तासगाव तालुक्यातील मणेराजूरी येथील पोपट कोरे या प्रगतशील शेतकऱ्यांने बारमाही द्राक्ष उत्पादनाची किमया साध्य केली आहे. महाराष्ट्रात पहिल्यांदा हा प्रयोग कोरे यांनी आपल्या अर्धा एकर शेती मध्ये "मस्कत डी ह्म्बुर्ग" या जातीचे युरोपियन द्राक्ष पीक घेतले आहे. 'सीडेडे' असणाऱ्या या द्राक्षांमध्ये औषधी गुणधर्म आहे. कॅन्सर व मधुमेह रुग्णांसाठी शुगर फ्री अशी उपयुक्त ही द्राक्ष असल्याचा दावा कोरे यांनी केला आहे. तसेच ही द्राक्ष विषमुक्त असून त्यामुळे लहान मुलांपासून आबालवृद्ध बिनधास्तपणे ही द्राक्ष खाऊ शकतात. त्याच बरोबर महत्त्वाचे म्हणजे या द्राक्षांची चव ही तीन वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये अनुभवयास मिळते. जांभूळ, रेड बेरी आणि करवंद अशा प्रकारचा स्वाद कोरे यांच्या द्राक्षांमध्ये चाखायला मिळतात.पाऊस प्रवण क्षेत्रात येतो, मग आपल्याकडे नाही ?याबाबत पोपट कोरे सांगतात, गेल्या 20 ते 25 वर्षांपासून आपण द्राक्ष बाग शेती करत आहोत. 10 ते 15 एकर क्षेत्रात द्राक्षांचे उत्पादन घेत आहोत. ही शेती करत असताना तमिळनाडू येथील काही मित्रांच्याकडे गेलो असता त्या ठिकाणी युरोपीय मस्कत वाणाची द्राक्ष शेती करत असल्याचे समोर आले. वास्तविक त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस असतो आणि अशा पाऊसात देखील तिथे द्राक्षाचे उत्पादन उत्तम प्रकारे येत असल्याची बाब आपल्यासमोर आली. त्यानंतर आपणही आपल्या भागामध्ये अशा पद्धतीचे द्राक्षाचे उत्पादन घेऊ शकतो, या विचाराने दोन वर्षांपूर्वी आपल्या अर्धा एकर बागेमध्ये मसकत जातीच्या वाणाची लागवड केली. ती करत असताना कोणत्याही प्रकारची रासायनीक औषध वापरले नाही. सुरवातीला थोडया प्रमाणात सेंद्रिय खतांचा वापर केला. त्यानंतर कोणत्याही प्रकारची रासायनिक औषध फवारणी बागेत केली नाही. अगदी कोणत्याही प्रकारचा पाऊस असो किंवा वातावरण असो, असा दावा कोरे यांनी केला आहे.कोणत्याही महिन्यात फळ छाटणी...महाराष्ट्रात साधारणपणे ऑक्टोंबर महिन्यात फळ छाटणी घेतली जाते. त्यानंतर चार महिन्याने म्हणजेच मार्च-एप्रिल दरम्यान द्राक्ष बाजारात दाखल होतात. मात्र, आपण जुलै माहिन्याच्या आसपास छाटणी घेतली होती. त्याने नोव्हेंबरच्या अखेरीस आपली द्राक्ष बाग चांगल्या पद्धतीने फुलली. या द्राक्षांचे एक वैशिष्ट्य म्हणजे अवकाळी पाऊसाचा कोणताही परिणाम या द्राक्षावर होत नाही. कारण गेल्या 2 ते 3 महिन्यापासून सातत्याने तासगाव तालुक्यात अवकाळी पाऊस पडला आहे. अनेक शेतकरयांचे हाता-तोंडाशी आलेले द्राक्ष पीक वाया गेले आहे. मात्र, आपल्या या द्राक्षांचे कोणत्याही प्रकारच्या नुकसान झाले नाही. त्यामुळे सुमारे 2 टन द्राक्षांचे उत्पादन घेतले आहे. त्यामुळे एका बाजूला द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं असताना आपले द्राक्ष पीक अत्यंत सुस्थितीत आहे. त्याला स्थानिक बाजारपेठेत मोठी मागणी असून चांगला दरही मिळत आहे. त्यामुळे यापुढील काळात काही माहिन्याच्या अंतराने आपल्या बागेत या मस्कत वाणची लागवड करण्यात येणार आहे. ज्यामुळे बारमाही द्राक्ष पिके मिळणार आहेत.शेतकऱ्यांसाठी नवी दिशा, तर खवय्यांची पर्वणी - सध्या महाराष्ट्रातील द्राक्ष उत्पादक शेतकरी निसर्गाच्या वेगवेगळ्या संकटामुळे मेटाकुटीला आले आहेत. अवकाळी पाऊस असो डावण्यासारखा रोग असो, यामुळे हातातोंडाशी आलेले द्राक्षाचे पीक उद्ध्वस्त होत आहे. त्यामुळे द्राक्ष शेती निसर्गाच्या लहरीपणाला बळी पडत असताना कोरे यांनी यशस्वी केलेली द्राक्ष शेती महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना नवी दिशा देणारी तर आहेच. शिवाय द्राक्ष खवय्यांसाठी पर्वणी ठरलेली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details