सांगली - देशात कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मात्र, माणसांसाठी असलेल्या संचारबंदीमुळे रस्त्यावर फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांचेही हाल होताहेत. भुकेने व्याकूळ झालेल्या कुत्र्यांची अवस्था या संचारबंदीत 'कुत्रं हाल खाणार नाही' या म्हणीचा प्रत्यय आणून देत आहे. मात्र, ही भटकी कुत्री पिसाळू नयेत, म्हणून सांगली महापालिकेने शहरातील भटक्या कुत्र्यांची भूक भागवण्याचे काम सुरू केले आहे.
संचारबंदीचा फटका : भटक्या कुत्र्यांचेही हाल, पिसाळू नये म्हणून महापालिका पुरवतेय अन्न - कोरोना प्रसार
सर्व काही बंद असल्याने रस्त्यावर पडणारे उष्टे-खरकटे अन्न किंवा अन्य गोष्टी बंद झाल्या आहेत. खायला काहीच मिळत नसल्याने भुकेने व्याकुळ झालेली कुत्री सैरभैर होऊ लागली आहेत. ही कुत्री पिसाळून रस्त्यावर जे कोणी दिसतील त्यांच्यावर हल्ले करण्याची शक्यता आहे.
देशभर संचारबंदी आहे. ती सांगलीतही लागू आहे. लोक आपआपल्या घरात आहेत. शहरे आणि रस्ते सामसूम झाले आहेत. दिवस-रात्र शहराच्या रस्त्यांवर माणसांची गर्दी असायची. मात्र, आता त्या रस्त्यांवर भटक्या कुत्र्यांचे राज्य पहायला मिळतेय. मात्र, रस्त्यांवर मोकाट फिरणारी ही कुत्री आता भुकेने पिसाळण्याच्या मार्गावर आहेत. शहरातील मोकळ्या रस्त्यांवरून जाणाऱ्या नागरिकांच्या मागे भटकी कुत्री लागल्याचे काही घटना समोर आल्या. सर्व काही बंद असल्याने कुठेच काही खायला मिळत नाही. त्यामुळे ही भटकी कुत्री पिसाळू शकतात. प्राणिमित्रांनी ही बाब महापालिका आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली होती. यानंतर खबरदारीची उपाययोजना म्हणून पालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी पालिका प्रशासनाच्या श्वान पथकाला पाचारण केले. मात्र, या भटक्या कुत्र्यांना सध्या पकडणे अशक्य असल्याने या भटक्या कुत्र्यांना जेवण पुरवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. शहरात महापालिका प्रशासनाचे डॉग व्हॅन पथक प्राणी मित्र अजित काशीद यांच्या माध्यमातून ठिकठिकाणी जाऊन भटक्या कुत्र्यांना दूध, जेवण पुरवत आहे.
सर्व काही बंद असल्याने रस्त्यावर पडणारे उष्टे-खरकटे अन्न किंवा अन्य गोष्टी बंद झाल्या आहेत. खायला काहीच मिळत नसल्याने भुकेने व्याकुळ झालेली कुत्री सैरभैर होऊ लागली आहेत. ही कुत्री पिसाळून रस्त्यावर जे कोणी दिसतील त्यांच्यावर हल्ले करण्याची मोठी शक्यता आहे. त्यांच्यासाठी अन्न उपलब्ध करून देणे हाच पर्याय होता. हे काम सुरू झाल्याचे प्राणीमित्र अजित काशीद यांनी सांगितले आहे.