महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अण्णाभाऊ साठे यांना 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करा; राज्य वाचन चळवळीची मागणी - अण्णाभाऊ साठे 'भारतरत्न' मागणी

तांत्रिकदृष्ट्या पूर्ण अशिक्षित असणाऱ्या अण्णाभाऊंनी मराठी साहित्यातील लोकवाड:मय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट पटकथा, पोवाडे, लावण्या, गौळण, प्रवासवर्णन असे सर्वच प्रकार सशक्तपणे हाताळून समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान पाहता त्यांना 'भारतरत्न' या नागरी सन्मानाने गौरवण्यात यावे, अशी मागणी राज्य वाचन चळवळीच्या वतीने करण्यात आली.

Annabhau Sathe
अण्णाभाऊ साठे

By

Published : Aug 1, 2020, 2:39 PM IST

सांगली - तुकाराम भाऊराव ऊर्फ अण्णाभाऊ साठे यांचा जन्म १ ऑगस्ट १९२०ला सांगलीच्या वाळवा तालुक्यातील वाटेगाव या लहानशा गावात झाला. हे वर्ष त्यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे. अण्णाभाऊ साठे हे महाराष्ट्राला प्रामुख्याने एक शाहीर म्हणून परिचित असले तरी कथा आणि कादंबरी हे साहित्यप्रकारही त्यांनी ताकदीने हाताळले. त्यांचे साहित्य क्षेत्रातील योगदान पाहता त्यांना 'भारतरत्न' या नागरी सन्मानाने गौरवण्यात यावे, अशी मागणी राज्य वाचन चळवळीच्यावतीने करण्यात आली.

अण्णाभाऊ साठे यांना 'भारतरत्न' पुरस्काराने सन्मानित करा

तांत्रिकदृष्ट्या पूर्ण अशिक्षित असणाऱ्या अण्णाभाऊंनी मराठी साहित्यातील लोकवाङ्मय, कथा, नाट्य, लोकनाट्य, कादंबऱ्या, चित्रपट पटकथा, पोवाडे, लावण्या, गौळण, प्रवासवर्णन असे सर्वच प्रकार सशक्तपणे हाताळून समृद्ध केले. तमाशा या कलेला लोकनाट्याची प्रतिष्ठा मिळवून देण्याचे श्रेय अण्णाभाऊंना दिले जाते. पोवाडे, लावण्या, गीते, पदं या काव्य प्रकारांचा त्यांनी सामान्य कष्टकरी जनतेत विचारांच्या प्रचारासाठी वापर केला. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्यानंतरच्या काळात राजकीय प्रश्नांविषयी महाराष्ट्रात त्यांनी मोठी जागृती केली. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम या चळवळींमध्ये त्यांनी पोवाड्यांमधून दिलेले योगदान महत्त्वाचे आहे.

१९४४ ला त्यांनी 'लाल बावटा' पथक स्थापन केले आणि बघता-बघता ते शाहीर झाले. 'माझी मैना गावाकडं राहिली, माझ्या जीवाची होतीया काहिली, ही त्यांची गाजलेली लावणी होती. अण्णाभाऊंनी छत्रपती शिवरायांचे चरित्र पोवाड्यातून रशियापर्यंत पोहोचवले. कारण त्यांच्या पोवाड्यांचे रशियन भाषेमध्ये भाषांतर झाले आणि राष्ट्राध्यक्षांकडून त्यांचा सन्मान देखील झाला. १६ ऑगष्ट १९४७ साली 'ये आझादी झूठी है देश की जनता भुकी है', असा नारा त्यांनी शिवाजी पार्कवर दिला. त्यादिवशी पावसाने रौद्र रूप धारण केले होते. मात्र, तरीही अण्णाभाऊ मागे हटले नाहीत.

अण्णाभाऊंनी आपल्या अल्पायुषी लेखनकाळातील २१ कथासंग्रह आणि ३६पेक्षा अधिक कादंबऱ्या लिहिल्या. त्यापैकी सात कादंबऱ्यांवर नामवंत मराठी दिग्दर्शकांनी चित्रपटही काढले. त्यांच्या ‘फकिरा’ या कादंबरीला १९६१ साली राज्य शासनाचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कारही मिळाला. तत्कालीन ज्येष्ठ साहित्यिक वि. स. खांडेकर यांनीही या कादंबरीचे कौतुक केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या झुंजार लेखणीला अर्पण केलेल्या ‘फकिरा’मध्ये भीषण दुष्काळाच्या काळात ब्रिटिशांचे खजिने, धान्य लुटून गरिबांना, दलितांना वाटप करणाऱ्या 'फकिरा' या मातंग समाजातील लढाऊ तरुणाचे चित्रण आहे. ‘वैजयंता’ कादंबरीत प्रथमच तमाशात काम करणाऱ्या कलावंत स्त्रियांच्या शोषणाचे चित्रण करण्यात आहे. ‘माकडीचा माळ’ ही भटक्या-विमुक्त समाजाच्या जीवनपद्धतीचे अतिशय सूक्ष्म चित्रण करणारी भारतीय साहित्यातील पहिली कादंबरी आहे. परंतु, तिची योग्य नोंद तथाकथित समीक्षकांनी घेतली नाही. कोळसेवाला, घरगडी, खाण कामगार, डोअर किपर, हमाल, रंग कामगार, मजूर, तमाशातला सोंगाड्या अशा विविध भूमिका अण्णांनी वठवल्या. अण्णांनी आपले उभे आयुष्य चिरागनगर झोपडपट्टीत काढले. याच झोपडपट्टीत अण्णाभाऊंच्या एकापेक्षा एक श्रेष्ठ कलाकृतींची निर्मिती झाली.

अशा अण्णाभाऊ साठेंना 'भारतरत्न' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात यावे. यासाठी राज्य वाचन चळवळचे अध्यक्ष राहुल वेदपाठक, एम.आर.पाटील, रघूनाथ नांगरे, ऋषीकेश राजमाने, दिपक साठे, राजेंद्र साठे, विशाल साठे यांनी शासनाला पत्र व्यवहार केला आहे. मुख्यमंत्री, राज्यपाल, केंद्रीय सांस्कृतिक मंत्री, राज्य सांस्कृतिक मंत्री यांना वाचन चळवळीच्यावतीने पत्र देण्यात आले.

ABOUT THE AUTHOR

...view details