सांगली -राज्य सरकारमध्ये एसटीच्या विलिनीकरणासह एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आता 10 नोव्हेंबर रोजी मंत्रालयावर धडक देणार असल्याचे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले आहे. एसटी कर्मचारी व त्यांच्या कुटुंबासह मंत्रालयाच्या दारात उघड्यावर संसार थाटणार असल्याचे स्पष्ट करत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. ते आटपाडीच्या झरे येथे बोलत होते.
'संकटात मराठी माणसाला वाऱ्यावर सोडण्याचा मराठी बाणा' -
एसटी कर्मचाऱ्यांच्या सुरू असलेल्या आंदोलनावरून भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली आहे. मागील काही दिवसात माझ्या 31 मराठी एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यातील 3 जनांचे प्राण वाचले आहेत. पण तरी या ठाकरे सरकारचा अबोला सुटत नाही. कारण एसटी कर्मचाऱ्यांच्या दारात जाऊन त्यांचे अश्रु पुसणे तर सोडा, साधे दोन ओळीचे सांत्वनाचे पत्रही मुख्यमंत्र्यांनी पाठवले नाही. मराठी माणसाच्या भरोश्यावरती आपले राजकारण करायचे आणि ते संकटात असताना त्यांना व त्याच्या कुटुंबाला वाऱ्यावरती सोडायचे. हाच यांचा मराठी बाणा आहे, अशी टीका पडळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.