सांगली -एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस वाहतूक ठप्प झाली आहे. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी बस स्थानकात आता लालपरीची जागा काळी-पिवळी आणि खासगी बसेसनी घेतली आहे. सांगली आगारामध्ये हे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एसटी प्रशासनाच्या वतीने बस स्थानकातून आता प्रवासी वाहतुकीसाठी खासगी वाहनांचा आधार घेण्यात आला आहे.
म्हणून खासगी वाहन घेऊन वाहतूक सुरू
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे एसटी प्रवासी वाहतूक ठप्प झाल्याने, आता एसटी प्रशासनाने आक्रमक भूमिका घेत एसटी बस स्थानकात थेट खासगी वाहनांना दाखल करून प्रवासी वाहतूक सुरू केली आहे. काळ्या-पिवळ्या प्रवासी गाड्यांच्या बरोबर खासगी बसेस आता सांगलीच्या बस स्थानकावर प्रवाशांच्या दिमतीला उभ्या राहिल्या आहेत. या खासगी वाहनातून आता प्रवासी वाहतूक सांगली आगारातून सुरू झाली आहे. प्रवाशांची सोय आणि त्यांना अधिकचे भाडे देण्याची वेळ येऊ नये, म्हणून शासनाकडून हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगलीचे परिवहन विभागाकडून अधिकारी प्रशांत इंगवले यांनी स्पष्ट केले आहे.
प्रवाशांच्या सोयीसाठी आधार
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे बस सेवा ठप्प झाल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत आणि या पार्श्वभूमीवर प्रशासनाने आता या लालपरीच्या जागी खासगी वाहने उभी राहिली आहेत. प्रशासनाच्या आदेशामुळे या ठिकाणी आपली खासगी वाहने प्रवाशांच्या वाहतुकीसाठी उभी केल्याचे खासगी वाहतूकदार संघटनेकडून स्पष्ट करण्यात आला आहे. त्यामुळे बस स्थानकातून खासगी वाहनातून आता प्रवासी वाहतूक सुरू झाली आहे.